मुंबई - अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपल्याचं दिसून येतंय. एककीडे हा सोहळ्या अवघ्या काही दिवसांवर आला असताना, दुसरीकडे खास आणि दिग्गजांना या सोहळ्याचं निमंत्रण दिलं जात आहे. मात्र, अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम अजून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे, हिंदू धर्मातील सर्वोच्च असलेल्या शंकराचार्यानी अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणे चुकीचे असल्याचे सांगत रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यावरुन, आता राजकीय वाद रंगला आहे. भाजपा आणि काँग्रेस या मुद्द्यावरुन आमने-सामने आले आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांचे योगदान काय, असा प्रश्न विचारत, शंकराचार्यांनी केलेल्या विरोधावरुन टीका केली. राणेंच्या या विधानावरुन आता काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेसकडून रविवारी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. नारायण राणे यांनी शंकराचार्य व हिंदू धर्माचा अपमान केला आहे. शंकराचार्यांचे योगदान विचारणाऱ्या राणे यांचे तरी हिंदू धर्मासाठी काय योगदान आहे, असा प्रतिप्रश्न करत भाजपाने राणे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. त्यानंतर, आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रक जारी करत, काँग्रेसच्यावतीने नारायण राणेंविरुद्ध राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांचे योगदान काय? असे वक्तव्य करून शंकराचार्य आणि हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात काँग्रेस पक्ष उद्या रविवार १४ जानेवारी रोजी राज्यभरात आंदोलन करणार आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
अतुल लोंढेंनीही घेतली पत्रकार परिषद
लोंढे म्हणाले, नारायण राणे हे राजकीय स्वार्थासाठी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये व काँग्रेसमधून भाजपात गेले आहेत. भाजपात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी हिंदू धर्माच्या सर्वोच्च पदावरील शंकराचार्य यांनाच तुमचे योगदान काय? असा सवाल विचारून त्यांनी सर्व मर्यादा पार केल्या आहेत. हिंदु धर्माच्या परंपरेनुसार वयाच्या ५१ ते ७५ वर्षांचा कालखंड हा वानप्रस्थाश्रमात घालवायचा असतो. या कालखंडात सर्वच क्षेत्रातून बाहेर पडून समाजोपयोगी कामे करावीत असे अपेक्षित आहे. नारायण राणे यांचे वय ७१ वर्ष आहे त्यांनी आता वानप्रस्थाश्रमाचा मार्ग धरावा असा, टोलाही त्यांनी लगावला.
काय म्हणाले होते राणे
"शंकराचार्यांनी होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात की त्यावर टीका करावी. म्हणजे हे शंकराचार्य आमच्या भाजपला मोदी साहेबांना राजकीय दृष्टीकोनातून पाहत आहेत. हे सर्व राजकीयदृष्टीकोनातून नव्हे तर राम आमचा देव आणि दैवत आहे त्यासाठी हे सर्व केलं जात आहे, मंदिर तयार होत आहे. रामाची मूर्ती तिथं जागेवर येतं आहे, आम्हाला त्याच्यापुढं नतमस्तक होता येत आहे याचं आम्हाला समाधान आहे. त्यामुळं शंकराचार्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. त्यांनी जीवनात हिंदु धर्मासाठी काय योगदान दिलं? हे त्यांनी सांगावं. जे योगदान हिंदु धर्मासाठी रामानं दिलं, ते त्यांनी दिलं आहे का?", असा सवाल राणेंनी विचारला आहे.