चेंबूरच्या खारदेवनगरात दोन गटांमध्ये संघर्ष, दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 16:38 IST2018-01-03T16:37:19+5:302018-01-03T16:38:57+5:30
भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघाने पुकारलेला महाराष्ट्र बंद मागे घेतला आहे.

चेंबूरच्या खारदेवनगरात दोन गटांमध्ये संघर्ष, दगडफेक
मुंबई - भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघाने पुकारलेला महाराष्ट्र बंद मागे घेतला आहे. पण चेंबूरच्या खारदेवनगरात दोन गटांमध्ये संघर्ष झाल्याचे वृत्त आहे. गोवंडी पोलीस ठाण्याची 1 नंबर गाडी फोडण्यात आली आहे. दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक चालू असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दगडफेक थांबवण्यास पोलिसांना अपयश येत आहे. चेंबूरमध्ये दोन महिला पोलीसही जखमी झाल्याची माहिती आहे.
कांजूरमार्ग रेल्वे स्टेशनवर तोडफोड
भीमा कोरेगाव प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदने राज्याच्या वेगवेगळया भागात हिंसक वळण घेतले आहे. मंगळवार प्रमाणे बुधवारीही मुंबईत ठिकठिकाणी हिंसक आंदोलने सुरु आहेत. कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर बुधवारी दुपारी जमावाने मोठया प्रमाणात तोडफोड केली.
रेल्वे स्टेशनवरील स्टीलच्या खुर्च्या तोडून ट्रॅकवर फेकण्यात आल्या होत्या. जमावाने स्टीलच्या चेअर्स, टयुबलाईट वॉटरवेंडिग मशीनची तोडफोड केली. स्थानक परिसरातील जाहीरात बोर्डाचे फलकही फाडण्यात आले होते. सध्या कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरात शुकशुकाट असून, रेल्वेचे कर्माचरी रुळावर फेकण्यात आलेल्या स्टीलच्या चेअर्स आणि अन्य साहित्य रुळावरुन हटवत आहेत.
घाटकोपरच्या आरसिटी मॉलजवळ तणाव
घाटकोपरच्या आरसिटी मॉलजवळ तणाव घाटकोपरच्या एलबीएस रोडवरील आरसिटी मॉलच्या मागे जाळपोळ करण्यात आली आहे. काही गाडया फोडण्यात आल्या आहेत. टायर जाळण्यात आले आहेत. आरसिटी मॉलच्याजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवलीत आंदोलनाला हिंसक वळण
भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला कल्याण-डोंबिवलीत हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी डोंबिवलीत रेल्वे स्थानकातील तिकिट खिडकीच्या काचा फोडल्या. कल्याणच्या पत्री पुलावर अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. संतप्त जमावाने कल्याण पश्चिमेतील शिवसेनेची मध्यवर्ती शाखा तोडल्याचे वृत्त आहे. कल्याणच्या शिवाजी चौकात आंदोलकांचा मोठा जमाव जमला आहे.