आयुष अभ्यासक्रमासाठी बारावीतील गुणांची अट रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 11:31 IST2025-08-29T11:31:09+5:302025-08-29T11:31:21+5:30
AYUSH Education: 'आयुष'च्या आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावीतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीन विषयांत ३०० पैकी किमान १५० गुण आवश्यक असल्याची अट आता काढून टाकण्यात आली आहे. या तीन विषयांत केवळ उत्तीर्ण असले तरीही या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

आयुष अभ्यासक्रमासाठी बारावीतील गुणांची अट रद्द
सांगली - 'आयुष'च्या आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावीतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीन विषयांत ३०० पैकी किमान १५० गुण आवश्यक असल्याची अट आता काढून टाकण्यात आली आहे. या तीन विषयांत केवळ उत्तीर्ण असले तरीही या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.
आयुष मंत्रालयाने यासंबंधी पत्र सर्व राज्यांना पाठविले होते. सीईटी सेलने सर्वच अभ्यासक्रमांसाठी २३ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत नोंदणी प्रक्रिया, तसेच एमबीबीएस व बीडीएस या अभ्यासक्रमांसाठी पहिली प्रक्रिया पार पडली. मात्र, आता वरील आदेशामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आयुष अभ्यासक्रमांसाठी आधी अर्ज केला नव्हता, अशा विद्यार्थ्यांसाठी १ ते ४ सप्टेंबर या कालावधीत नव्याने अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
६ सप्टेंबरला गुणवत्ता यादी
आयुष अभ्यासक्रमांसाठी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी ६ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येईल. ८ सप्टेंबर ते १० सप्टेंबर सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी या अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम देता येईल. आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी या अभ्यासक्रमांसाठी पहिल्या फेरीचा निकाल १२ सप्टेंबर रोजी घोषित करण्यात येईल.