Join us

‘त्या’ वादग्रस्त जेलरची चौकशी संपेना! १७ महिला पीएसआयचा लैंगिक छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 03:56 IST

१७ महिला पीएसआयचा लैंगिक छळ : विशाखा चौकशी समितीला पुन्हा मुदतवाढ

जमीर काझी 

मुंबई : महाराष्ट्र कारागृह सेवेतील सर्वाधिक वादग्रस्त वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक असलेल्या निलंबित अधीक्षक हिरालाल जाधव यांच्यावरील लैंगिक छळप्रकरणी चौकशी अद्याप रखडली आहे. सहा वर्षांपूर्वीच्या घटनेच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशाखा समितीला गृहविभागाने चौथ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता २२ एप्रिलपर्यंत समितीने तपास पूर्ण करून अहवाल सादर करायचा आहे.

गेल्या सुमारे अडीच वर्षांपासून निलंबित असलेले जाधव हे दौलतराव जाधव ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत असताना, त्यांच्याविरुद्ध १७ प्रशिक्षणार्थी जेलर तरुणींनी लैंगिक छळ केल्याची लेखी तक्रार दिली होती. त्याबाबतच्या प्राथमिक अहवालानंतर तब्बल पाच वर्षांनी राज्य सरकारने विशाखा समिती स्थापन केली. या समितीने दोन महिन्यांत या प्रकरणाचा तपास करून त्याचा अहवाल सादर करायचा होता. मात्र, अद्याप या समितीच्या चौकशी अहवालाला ‘मुहूर्त’ मिळालेला नाही. गेल्या दहा महिन्यांपासून समितीच्या अध्यक्षा मुंबई उपायुक्त (मुख्यालय-२) एन.अंबिका या आहेत. पाच जणांच्या समितीची स्थापना झाली, तेव्हा तत्कालीन अप्पर आयुक्त (एलए)अस्वती दोरजे या होत्या. गेल्या वर्षी जूनमध्ये त्यांची पदोन्नती झाल्यानंतर अध्यक्षपद अंबिका यांच्याकडे सोपविले.प्रशिक्षणार्थी जेलर तरुणींच्या लेखी तक्रारीनंतर प्राथमिक चौकशी झाली. त्यानंतर, चार वर्षे प्रकरणाची फाइल धूळखात होती. दरम्यान, उपायुक्त अंबिका यांनी चौकशी पूर्ण न झाल्याने, २२ जानेवारीला मुदतवाढ देण्याची विनंती सरकारकडे केली. त्यानुसार, समितीला २२ एप्रिलपर्यंत चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली.असे आहे ट्रेनिंग कॉलेजमधील प्रकरणहिरालाल जाधव हे २०१३ मध्ये येरवड्यातील कारागृहाच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्राचार्य असताना, आलेल्या उपनिरीक्षक तरुणींशी अश्लील वर्तन करीत होते. त्यांच्या छळाला कंटाळून १७ जणींनी एकत्रित वरिष्ठांकडे तक्रार केली. तत्कालीन तुरुंग विभागाचे उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी प्राथमिक चौकशी करून ६ डिसेंबर, २०१३ मध्ये अहवाल दिला. त्यानंतर, जाधव निलंंबित झाले. मात्र, विभागीय चौकशी मुदतीत पूर्ण न झाल्याने सुमारे दीड वर्षाने ठाणे कारागृहात अधीक्षक म्हणून ते रुजू झाले. तेथेही महिला कर्मचाऱ्याशी अश्लील वर्तन केल्याने आॅगस्ट, २०१६ मध्ये त्यांचे निलंबन झाले. याबाबत पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, या प्रलंबित चौकशीबाबत अंबिका यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, इतकेच सांगून अधिक भाष्य करण्यास नकार दिला.वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोपभायखळा महिला कारागृहात दोन वर्षांपूर्वी मंजुळा शेट्ये हिची अमानुष मारहाणीत हत्या झाली. यातील महिला तुरुंगाधिकारी मनीषा पोखरकर व अन्य पाच महिला रक्षकांना वाचविण्यासाठी उपमहानिरीक्षक स्वाती साठे या प्रयत्नशील आहेत, असा आरोप हिरालाल जाधव यांनी केला होता. त्याबाबतचा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज व्हायरल करून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्या प्रकरणाचा तपास बारगळला आहे.१७ महिला पीएसआयने केलेल्या लेखी तक्रारींनंतर तीन महिन्यांच्या कालावधीत स्थानिक स्तरावर चौकशी होणे आवश्यक होते. मात्र, तसे न झाल्याने ही समिती ‘मॅट’ने बेकायदेशीर ठरविली आहे, तरीही चौकशी कायम ठेवल्याने त्याविरुद्ध मी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.- हिरालाल जाधव(निलंबित कारागृह अधीक्षक) 

 

टॅग्स :पोलिसमुंबईगुन्हेगारी