वाढत्या वायुप्रदूषणाची चिंता; महापालिका पुन्हा अॅक्शन मोडवर, विकासकामांवर 'वॉच', अभियंते, पर्यावरण विभागातील अधिकारी, पोलिस करणार पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 12:37 IST2025-11-15T12:36:47+5:302025-11-15T12:37:26+5:30
Air Pollution News: पावसाळा संपताच मुंबईतील वायुप्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने वायुप्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईतील २४ विभाग कार्यालयांना आपली विशेष पथके पुन्हा कार्यान्वित करण्याच्या सूचना केल्या आहेत.

वाढत्या वायुप्रदूषणाची चिंता; महापालिका पुन्हा अॅक्शन मोडवर, विकासकामांवर 'वॉच', अभियंते, पर्यावरण विभागातील अधिकारी, पोलिस करणार पाहणी
मुंबई - पावसाळा संपताच मुंबईतील वायुप्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने वायुप्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईतील २४ विभाग कार्यालयांना आपली विशेष पथके पुन्हा कार्यान्वित करण्याच्या सूचना केल्या आहेत. या पथकांमध्ये विभाग कार्यालयातील दोन अभियंते आणि एक पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे.
यंदापासून या सर्व पथकांमध्ये पर्यावरण विभागातील एका अधिकाऱ्याचा समावेश बंधनकारक आहे. प्रदूषण ट्रॅकिंग आणि मॉनिटरिंग वाहनांसह विभागातील विकासकामांवर त्यांची नजर राहणार आहे.
वायुप्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेने २८ मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी करणे शहरातील सर्व विकासकांना बंधनकारक असून, त्यावर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेने प्रत्येक विभागस्तरावर पथके नेमण्याची सूचना केली आहे. हिवाळ्यात 'पीएम २.५' आणि 'पीएम १०' या दोन्ही प्रदूषकांचे प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे.
...तर पथक बजावणार नोटीस
प्रत्येक वॉर्डमधील सर्व बांधकाम व पाडकाम प्रकल्पांची दररोज तपासणी या विशेष पथकांकडून करण्यात येईल. या प्रत्येक पथकाला विकासकामाच्या तपासणीचे फोटो, वेळ आणि जीपीएस लोकेशनसह नोंद करणे बंधनकारक आहे. विकासकामात कोणत्याही त्रुटी आढळल्यास संबंधित विकासक, प्राधिकरणाला कारणे दाखवा किंवा काम थांबवण्याची नोटीस पथकाकडून देण्यात येईल.
सूचनांचे पालन आवश्यक
विकासकामाच्या ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी पाण्याची फवारणी नियमित होते का?
बांधकाम साहित्य झाकून ठेवले आहे का ?
सेन्सर-आधारित एअर क्वालिटी मॉनिटर्स व एलईडी डिस्प्ले बसवले आहेत का ?
साइटवर कचरा जाळला जातोय का?
मजुरांसाठी शौचालय, पाणी, निवारा यासारख्या मूलभूत सोयी उपलब्ध आहेत का ?
पाडकाम किंवा साहित्य वाहतुकीदरम्यान धूळ रोखण्यासाठी उपाययोजना आहेत का ?
प्रत्येक यंत्रणा आणि उपकरणांचे नियमांनुसार पालन होते का ?
५ तारखेपर्यंत अहवाल सादर करणे बंधनकारक
वायुप्रदूषणाविरोधात प्रत्येक वॉर्डने केलेल्या तपासण्या, नोटिसा व कारवाईचा संपूर्ण अहवाल दर महिन्याला ५ तारखेपर्यंत पर्यावरण विभागाकडे पाठवायचा आहे.
त्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, स्थानिक पोलिस आणि संबंधित विभागांशी समन्वय वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पथकाचे नेतृत्व
नव्याने कार्यान्वित केल्या जाणाऱ्या पथकांमध्ये बांधकाम व कारखाने विभागातील आणि पर्यावरण विभागातील प्रत्येक विभागातील अभियंते आणि एक पोलिस कर्मचारी यांचा समावेश असेल. प्रत्येक पथकाचे नेतृत्व वॉर्डमधील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे असेल.