कुंभमेळ्यासाठीची कामे दर्जेदार व गतीने पूर्ण करा; मुख्यमंत्री : नवीन रिंगरोड साधूग्राम त्वरित पूर्ण करावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 08:24 IST2025-10-05T08:23:43+5:302025-10-05T08:24:05+5:30
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ची आढावा बैठक झाली.

कुंभमेळ्यासाठीची कामे दर्जेदार व गतीने पूर्ण करा; मुख्यमंत्री : नवीन रिंगरोड साधूग्राम त्वरित पूर्ण करावे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कुंभमेळा श्रद्धा आणि सांस्कृतिक व धार्मिक परंपरेचे प्रतीक असल्याने नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची पायाभूत सुविधांची सर्व कामे दर्जेदार व गतीने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नाशिकमधील नवीन रिंगरोडचे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावे तसेच साधूग्राम, टेंट सीटीसाठीची भूसंपादनाची कामेही गतीने पूर्ण करावीत, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ची आढावा बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, पणनमंत्री जयकुमार रावल, नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव राजेशकुमार, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळा हा धार्मिक श्रद्धेचे प्रतीक असल्याने संपूर्ण कुंभमेळा कालावधीत रामकुंडात आणि नेहमीसाठीच नदीपात्रातील पाणी स्वच्छ राहील, हे कटाक्षाने पाहावे.
दिरंगाई चालणार नाही
नाशिकमधील नवीन रिंगरोडचे काम त्वरित पूर्ण करावे. या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक निधी त्वरित मंजूर करून घ्यावा. इतर रस्त्यांची कामेही त्वरित हाती घेण्यात यावी.
कुंभमेळ्याच्या प्रचार प्रसिद्धीसाठी ‘डिजिटल कुंभ’ ही संकल्पना राबविण्यात यावी. प्रचार प्रसिद्धीसाठी स्वतंत्रपणे वेगळा आराखडा तयार करून नियोजन करण्यात यावे.
कुंभमेळ्यासाठीच्या आवश्यक कामांसाठी जिल्हास्तरावरील नोकरभरतीलाही गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
विविध आखाड्यांशी चर्चा करून त्यांच्या गरजेनुसार साधूग्राममध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
सीसीटीव्ही कॅमेरे प्रणाली केंद्रिकृत पद्धतीने तयार करण्यात यावी.