रेल्वे लाइनवरील पूल मुदतीपूर्वी पूर्ण करा! समन्वयाच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 16:41 IST2025-02-12T16:40:19+5:302025-02-12T16:41:24+5:30
मुंबईकरांची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेच्या पूल विभागामार्फत महत्त्वपूर्ण प्रकल्प होती घेण्यात आले आहेत.

रेल्वे लाइनवरील पूल मुदतीपूर्वी पूर्ण करा! समन्वयाच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश
मुंबईकरांची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेच्या पूल विभागामार्फत महत्त्वपूर्ण प्रकल्प होती घेण्यात आले आहेत. या पुलांची उभारणी करताना पालिका, रेल्वे, पोलीस, बेस्ट यांच्यात समन्वयाने पुलांचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करण्याचे प्रयत्न करावेत, अशा स्पष्ट सूचना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. अंधेरीतील गोपाळकृष्ट गोखले पूल, विक्रोळी पूल, कर्नाक पूल या रेल्वे रुळांवरील उड्डाणपुलांचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करुन ते वाहतुकीस खुले करावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
पालिकेच्या पूल खात्यामार्फत मुंबईत विविध ठिकाणी पूल उभारणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर आणि वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी सोमवारी पालिका, रेल्वे, पालीस आणि बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली.
गोखले पूल
अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाचे दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे ओव्हरब्रिजचे काम नुकतेच पूर्ण झाले. आता पोहोच रस्त्याचे काम संपवून ३० एप्रिलपासून गोखले पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीस खुला करावा, असेही त्यांनी सांगितले.
विद्याविहार पूल
विद्याविहार पुलाचे दोन्ही गर्डर स्थापित झाले असून पुलाची उर्वरित कामे मार्गी लावण्यासाठी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील काही बांधकामे हटवावी लागणार आहेत. पश्चिम दिशेला उतार (सॉलिड रॅम्प) करावा लागणार आहे. विद्याविहार पूल वाहतुकीस लवकरात लवकर खुला करण्याचा पालिकेचा मानस असल्याचे बांगर यांनी सांगितले.
सायन पूल
सायन उड्डाणपूल पाडण्याची कार्यवाही प्रलंबित आहे. येथे नागरिकांची गैरसोय होता कामा नये. याची खबरदारी रेल्वे प्रशासनासोबतच पालिकेने घेतली पाहिजे. योग्य नियोजन करत ३१ मे २०२६ पर्यंत हा उड्डाणपूल पूर्ण करावा, अशा सूचना बांगर यांनी केल्या.
बेलासिस पूल
१. बेलासिस पुलाचे बांधकाम डिसेंबर अखेरपर्यंत वाहतुकीस खुला करण्यासाठी प्रयत्न करावेत.
२. या पूल बांधकामास अडथळा ठरणारी १२ बांधकामे हटविण्यात आली आहेत.
३. या पुलाच्या परिसरात उरलेली आणखी १२ बांधकामे महिनाभरात हटवली पाहिजेत, व्यावसायिकांचे पुनर्वसन सुयोग्य ठिकाणी केले पाहिजे, असेही अतिरिक्त आयुक्तांनी स्पष्ट केले.