Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस; ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 12:48 IST2025-09-02T12:46:45+5:302025-09-02T12:48:15+5:30
Lalbaugcha Raja 2025: सहा आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस; ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळात व्हीआयपी व इतर सामान्य भक्तांसाठी वेगळी दर्शन व्यवस्था राबवण्याच्या प्रकरणात महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाने मंडळाला नोटीस बजावली आहे. ॲड. आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी लालबागचा राजा मंडळात व्हीआयपी आणि नॉन व्हीआयपी दर्शनाच्या व्यवस्थेविरोधात महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीची दखल आयोगाने घेतली असून, राज्याचे मुख्य सचिव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबई पोलिस आयुक्त, मुंबई महापालिकेचे आयुक्त, यांच्यासहित लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व सचिवांना नोटीस बजावून सहा आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी ७ ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली आहे. सार्वजनिक उत्सव असूनही दर्शनासाठी व्हीआयपी आणि सामान्य भक्त अशी वेगळी रांग लावून सर्वसाधारण भक्तांच्या भावनांचा अनादर होत आहे. तसेच सर्वसामान्यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते, तर काही मोजक्यांना विशेष सवलत मिळते, हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे, असे आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दोन वर्षे सलग तक्रार
गणेशोत्सव हा लोकउत्सव असल्याने दर्शन सर्वांसाठी समान आणि सुलभ असावे. दर्शन व्यवस्थेत भेदभाव टाळावा आणि सामान्य भाविकांना न्याय द्यावा, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. या प्रकरणी राय व मिश्रा यांनी २२ सप्टेंबर २०२३ व १४ सप्टेंबर २०२४ रोजी तक्रारी करूनही राज्य प्रशासन व पोलिसांकडून कारवाई करण्यात आली नाही, याकडे तक्रारदारांनी आयोगाचे लक्ष वेधले आहे. गर्दी नियंत्रणातील त्रुटीमुळे चेंगराचेंगरी होण्याची भीती आहे, मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वर्तनामुळे लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व अशक्त अशा विविध भाविकांचे व सामान्य जनतेच्या मानवी अधिकारांचे उल्लंघन झाले आहे, अशी तक्रार त्यांनी केली होती.