लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई:कुर्लाबेस्ट अपघाताची सविस्तर चौकशी करण्यासाठी वाहतूक विभागाचे मुख्य व्यवस्थापक यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. या अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून रुपये २ लाख रुपये बेस्ट उपक्रमामार्फत जाहीर करण्यात आले आहेत. तसेच जखमींवर औषधोपचारांचा खर्च मुंबई महानगरपालिका व बेस्ट उपक्रम यांच्यामार्फत केला जाणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे.
भरधाव बेस्ट बसने दिलेल्या धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला असून ४९ पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. कुर्ला पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवत बेस्ट बस चालक संजय मोरे याला अटक केली आहे. तसंच पोलिसांनी आरोपी चालक संजय मोरे याच्याकडून अवजड वाहन चालवण्याचा परवाना जप्त केला आहे. मोरेला अन्य वाहनांसह मिनी बस चालवण्याचा अनुभव होता. पण, इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव नव्हता, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. त्यामुळे, आरोपी चालक मोरेची नियुक्ती करणाऱ्या बेस्ट प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची पोलीस चौकशी करणार आहेत.
राज्य सरकारकडूनही मदतीची घोषणा
कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही त्यांनी म्हटले आहे. या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे.