Join us

आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; मुंबईकरांसाठी केली मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 08:42 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत आदित्य ठाकरे यांनी महत्त्वाची मागणी केली आहे.

Aditya Thackeray Letter: वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महत्त्वाची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील कलेक्टर लँड फ्री होल्ड करण्याचा दर १ टक्का करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे. याचा मुंबईकरांना फायदा होणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्याआधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.

आदित्य ठाकरे यांनी हे पत्र त्याच्या एक्स सोशल मिडिया अकाऊंटवरुन शेअर केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील कलेक्टर लँड फ्री होल्ड करण्याचा दर १ टक्का करावा, ही विनंती केली होती. त्यावर आज पुन्हा एकदा विधिमंडळात विनंती केली. यामुळे लवकरच मुंबईकरांना न्याय आणि संधीचा लाभ घेता येईल, ही आशा बाळगतो, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पत्रात काय म्हटलं?

"मुंबई शहर व महाराष्ट्रातील कलेक्टर लॅन्ड विविध कारणांसाठी गृहनिर्माण संस्थांना भाडेकरारावर रहिवासी वापरासाठी दिलेल्या आहेत. सदर कलेक्टर लॅन्ड फ्री होल्ड करण्यासाठी १५ टक्के इतका दर आकारण्यात येतो. हा दर १ टक्का करण्यात यावा, जेणेकरून अशा जमिनीवर असणाऱ्या गृहनिर्माण संस्थामधील सामान्य नागरीकांना त्याचा फायदा होईल तसेच गृहनिर्माण संस्थांच्या जागा फ्री होल्ड करून घेण्याचे प्रमाण वाढून सरकारी तिजोरीमध्ये हि भर पडेल. तरी महाराष्ट्रातील कलेक्टर लॅन्ड फ्री होल्ड करण्याचा दर १ टक्का करावा हि विनंती," असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला 

 विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर जोरदार टीका केल्यानंतर राजकीय पक्ष पुन्हा एकत्र दिसत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली. यावेळी उद्धव यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, अनिल परब उपस्थित होते. उद्धव ठाकरे हे सध्या विधान परिषदेचे सदस्य आहेत. या भेटीनंतर महाराष्ट्रातही राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी उद्धव ठाकरे मंगळवारी नागपुरात पोहोचले. येथे पोहोचल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोघेही फडणवीस यांच्या दालनात भेटले. उद्धव ठाकरे यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसंदर्भात आदित्य ठाकरे यांनी माहिती दिली. "आमच्या पक्षप्रमुखांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे. दोघांनीही महाराष्ट्रासाठी काम करताना राजकीय शहाणपण दाखवले पाहिजे. महाराष्ट्राकडून अपेक्षा आहे की ते एकत्र येऊन काम करू," असं आदित्य ठाकरे म्हणाले.

टॅग्स :आदित्य ठाकरेदेवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेमुंबई