Join us
Daily Top 2Weekly Top 5

मालाड टी जंक्शन ते मार्वे जेट्टी पर्यंतच्या नव्या सीसी मार्गाच्या निर्मिती वरून उबाटा आणि कॉंग्रेसमध्ये श्रेयवादावरुन शीतयुद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 17:26 IST

नव्या सीसी मार्गाला मान्यता मिळाल्यानंतर २ दिवसांपूर्वी मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्राचे स्थानिक आमदार व माजी मंत्री अस्लम शेख यांचे भूमिपूजनाचे फलक झळकायला सुरुवात झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई-आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्रितरीत्या लढविणार हे जवळपास निश्चित असताना मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये कॉंग्रेस व शिवसेनेत श्रेयवादावरुन नव्या शितयुद्धाची सुरुवात झाली आहे.

मुद्दा असा आहे की,मालाड टी जंक्शन ते मार्वे जेट्टी पर्यंत बनत असलेल्या नव्या सीसी मार्गाचा. बृहन्मुंबई महानगरपालिकेने नुकतीच या सीसी मार्गाला मंजुरी दिलेली आहे.  गेली अनेक वर्ष हा मार्ग सीसी मार्ग व्हावा अशी स्थानिकांची मागणी होती. जवळपास ८ कि.मी. लांबीचा हा मार्ग. मात्र रस्त्यांवर पडलेले खड्डे, मार्गावर जलवाहिन्यांची सुरु असलेली कामे यांमुळे हे अंतर कापण्यासाठी कधी-कधी एका तासापेक्षा जास्त वेळ लागतो. सीसी मार्ग बनल्याने प्रवासाचा वेळ वाचण्यासोबतच अपघातांचे प्रमाण देखील कमी होणार असल्याने सर्व पक्षियांसाठी राजकीय श्रेय घेण्याच्या दृष्टीने हा मुद्दा महत्त्वाचा.

नव्या सीसी मार्गाला मान्यता मिळाल्यानंतर  २ दिवसांपूर्वी मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्राचे स्थानिक आमदार व माजी मंत्री अस्लम शेख यांचे भूमिपूजनाचे फलक झळकायला सुरुवात झाली. फलकांच्या माध्यमातून गेल्या शुक्रवारी सायं ६ वाजता भूमिपूजन असल्याचा संदेश कॉग्रेसकडून पसरविण्यात आला. मात्र शिवसेना (उबाठा)चे येथील विभागप्रमुख अजित भंडारी,महिला विभागसंघटक मनाली चौकीदार,संगीता सुतार, विधानसभा निरीक्षक संजय सुतार आणि इतर स्थानिक नेत्यांकडून दुपारीच सदर मार्गाच्या तीन ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकला गेल्याने महाविकास आघाडीच्या दोन्ही पक्षांमधील ही शितयुद्धाची सुरुवात मानली जात आहे.

याबाबत आमदार अस्लम शेख यांनी सांगितले की,मागील अनेक वर्षांपासून हा मार्ग सीसी मार्ग बनावा या दृष्टीने मी प्रयत्नशिल होतो. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नवीन रस्ता मंजूर होण्याच्या प्रक्रियेस गती मिळाली. नवीन सीसी मार्ग बनावा यासाठी पालिका प्रशासनासोबत वारंवार बैठका देखील घेतल्या गेल्या. आज ह्या मार्गाचे काम सुरु होत आहे, ही आनंदाची बाब आहे. मला कोणत्याही प्रकारच्या श्रेयवादाच्या लढाईत रस नाही. कोंबडं कोणाचंही आरवूदे विकासाचा सूर्य उगवणं महत्त्वाचं आहे.

पी उत्तर विभागाच्या माजी प्रभाग समिती अध्यक्ष व येथील शिवसेनेच्या माजी नगरसेविका संगीता सुतार यांनी याप्रकरणी पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार व सातत्याने पाठपुरावा केला होता. याकामासाठी अनेक बैठका घेतल्या आणि पालिका प्रशासनाने अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केली.यामुळेयाकामाचे श्रेय हे शिवसेनेचे आहे असे महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस  किरण कोळी यांनी सांगितले. 

टॅग्स :काँग्रेसउद्धव ठाकरे