cold to grow in state in three days; Chance of rain in Konkan with Mumbai today | तीन दिवसांत राज्यात वाढणार गारठा; मुंबईसह कोकणात आज पावसाची शक्यता
तीन दिवसांत राज्यात वाढणार गारठा; मुंबईसह कोकणात आज पावसाची शक्यता

मुंबई : उत्तर भारतातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान ६ अंशाच्या खाली उतरले असून, उत्तरेकडून मध्य भारताकडे वाहत असलेल्या शीत लहरींमुळे या प्रदेशाला हुडहुडी भरली आहे. दुसरीकडे आता महाराष्ट्रातही गारठा वाढण्याच्या मार्गावर असून, पुढील तीन दिवसांत राज्याच्या किमान तापमानात घट नोंदविण्यात येईल. गारठा वाढण्याची सुरुवात विदर्भापासून होईल; त्यानंतर मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी किमान तापमानात घट नोंदविण्यात येईल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.
देशातील मैदानी राज्यात थंडीचा प्रभाव वाढू लागला आहे. पंजाब आणि हरयाणासोबत उत्तर पश्चिम भारत, मध्य भारत आणि पूर्व भारतातील राज्यात शीत वारे वाहत आहेत. परिणामी, किमान तापमानात अधिकाधिक घट नोंदविण्यात येत आहे. नोव्हेंबर अखेर उत्तर भारतातील पर्वतरांगामध्ये हिमवृष्टी झाली होती. यामुळेही किमान तापमानात घट नोंदविण्यात येत आहे, अशी माहिती ‘स्कायमेट’कडून देण्यात आली.
उस्मानाबाद @ १५
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वांत कमी किमान तापमान उस्मानाबाद येथे १५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. अहमदनगर, महाबळेश्वर, अमरावती, गोंदिया, नागपूर आणि वाशिम या शहरांच्या किमान तापमानात घट नोंदविण्यात येत आहे. गुरुवारी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, मुंबई ढगाळ राहील.
आणखी दोन चक्रीवादळे
अरबी समुद्रात पुन्हा एकदा एकाच वेळी दोन चक्रीवादळांची निर्मिती होत आहे. ‘पवन’ आणि ‘अम्फान’ अशी या त्यांची नावे आहेत.

राज्याच्या विविध शहरांमधील बुधवारचे किमान तापमान
(अंश सेल्सिअसमध्ये)
अहमदनगर १५.४
महाबळेश्वर १५.४
अमरावती १६.६
गोंदिया १५.४
नागपूर १६.१
वाशिम १६.४

Web Title: cold to grow in state in three days; Chance of rain in Konkan with Mumbai today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.