दिवाळीत दागिन्यांपेक्षा नाणीच खणखणली; सराफ बाजारात खरेदी, विक्रीचा उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 08:35 IST2025-10-24T08:34:18+5:302025-10-24T08:35:20+5:30
साडेतीन हजार कोटींची उलाढाल

दिवाळीत दागिन्यांपेक्षा नाणीच खणखणली; सराफ बाजारात खरेदी, विक्रीचा उत्साह
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दिवाळीच्या चार दिवसांत सोने एक लाख ३४ हजारांहून एक लाख २८ हजारांवर खाली घसरले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याचा भाव दुप्पट होता. त्यामुळे सोन्याच्या बाजारात खरेदीविक्रीचा उत्साह तुलनेने कमी असला तरीही दिवाळीच्या चार दिवसांत महामुंबईत सोन्याच्या बाजारपेठेत सुमारे साडेतीन हजार कोटींच्या खरेदी-विक्रीची उलाढाल झाल्याचे सोने व्यापाऱ्यांनी सांगितले. ग्राहकांनी सोन्याकडे यावेळी हौस म्हणून पाहण्यापेक्षा गुंतवणूक म्हणून पाहिल्याचे निरीक्षण व्यापाऱ्यांनी नोंदविले.
ज्वेलर्स आनंद पेडणेकर यांनी सांगितले की, सोन्याच्या खरेदी-विक्रीचे अंतिम आकडे आलेले नाहीत. कारण, आणखी विश्लेषण बाकी आहे. तरीही अंदाजानुसार, यावर्षी सोने वजनामध्ये तुलनेने कमी विकले गेले. पण, पैसे जास्त आले. कारण, सोन्याचा भाव जास्त होता. दिवाळीच्या चार दिवसांत मुंबईत सुमारे साडेतीन हजार कोटींचे सोने विकले गेले असावे.
देशभरात सुमारे ८० ते ८५ हजार कोटींच्या सोन्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले असावेत. दागिन्यांची विक्री मोठी झाली. मधल्या काळात सोन्याच्या नाण्यांची मागणी वाढली. कारण, भावात बदल झाले. आता लग्नसराई सुरू होणार असल्याने पुन्हा मागणी वाढेल. कुमार जैन यांच्याकडील माहितीनुसार, देशभरात सुमारे १२५ टन सोने विकले गेले आणि ९६ हजार कोटींची उलाढाल झाली. सोन्याची नाणी आणि बिस्किट, सोनसाखळी, अंगठी, कानातले आणि लाइट ज्वेलरी अधिक विकली गेली.
गुंतवणूक म्हणून खरेदी
आशिष पेठे यांनी सांगितले की, दागिन्यांच्या तुलनेत सोन्याच्या नाण्यांना अधिक मागणी होती. ग्राहकांनी गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी केल्याचे दिसून आले. आता काही दिवस सोन्याचा भाव स्थिर राहील. मात्र, पुन्हा सोन्याच्या भावात वाढ होईल.
निर्भय सिंग यांनी सांगितले, गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याचा भाव यावर्षी दुप्पट होता. साठ ते सत्तर हजार तोळ्यावर असलेले सोने यावर्षी १ लाख ३४ वर आल्याने सोन्याची विक्री वजनाच्या तुलनेने कमी झाली. दिवाळीच्या चार दिवसांत सोन्याची बिस्किटे, सोन्याच्या नाण्यांना अधिक मागणी होती. धनत्रयोदशी व लक्ष्मीपूजनाला सोने-चांदीची नाणी अधिक विकली गेली.