कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 07:18 IST2025-11-03T07:18:09+5:302025-11-03T07:18:30+5:30
वाहनचालकांकडून तक्रारी; सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला झाल्यानंतर त्यावरील गाड्यांची वर्दळ वाढली आहे. मात्र, अनियंत्रित वेगमर्यादेमुळे अपघाताची काही प्रकरणे घडली आहेत. या परिस्थितीत वरळी ते वांद्रे सी लिंकदरम्यान असलेल्या खांबांवरील दिवे बंद असल्याने चालकांना अंधारातून प्रवास करावा लागत आहे. परिणामी गंभीर अपघाताचा धोका वाढला आहे.
एका प्रवाशाने सोशल मीडियावरून याप्रकरणी तक्रार केली आहे. दरम्यान, कोस्टल रोडसाठी तब्बल १४ हजार कोटी खर्च करूनदेखील प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल तर मुंबईकरांनी विजेच्या खांबांसाठी आपल्या खिशातून पैसे द्यायचे का, असा सवाल मुंबईकरांनी उपस्थित केला आहे.
कोस्टल रोड सुरू झाल्यापासून सप्टेंबरपर्यंत आठ हजारांहून अधिक वाहनांनी वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याचे समोर आले. यात बोगद्यात वाहनांचा सर्वाधिक वेग ताशी १४१ ते १४७ किमीपर्यंत पोहोचल्याचेही समोर आले. अशातच कोस्टलवरील वळणांच्या मार्गावर अंधार असेल तर
अपघातांच्या संख्येत वाढ होण्याची भीती आहे.
पादचारी भुयारी मार्गातही अंधार
समुद्राचे सौंदर्य न्याहाळता यावे म्हणून पालिकेने मुंबईकरांसाठी प्रोमेनाड खुला करून दिला. त्यावर जाण्यासाठी काही ठिकाणी पादचारी भुयारी मार्गही (पीयूपी) खुले करून दिले आहेत. मात्र, त्यातून प्रवास करताना नागरिकांना मोबाइल लाइटचा वापर करावा लागतो. कोस्टल रोडवर वेगमर्यादेचे उल्लंघन करत एक कार कठडा तोडून थेट समुद्रात कोसळल्याची घटना ऑक्टोबरमध्ये घडली होती. या घटनेत रोडच्या लोखंडी रेलिंगचे (संरक्षक कठडा) मोठे नुकसान झाले होते. याबद्दल पालिकेकडून संबंधित तरुणाला दोन लाख ६५ हजार रुपये नुकसानभरपाई भरण्यासाठी पत्र पाठवण्यात आले आहे.