दहिसर-भाईंदर मेट्रोची सीएमआरएसकडून तपासणी; आतापर्यंत नऊ मार्गिकांवर प्राथमिक चाचण्या पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 13:21 IST2025-12-14T13:15:26+5:302025-12-14T13:21:52+5:30
दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो नऊ मार्गिकेवर सीएमआरएस प्राथमिक पथकाकडून चाचण्या पूर्ण केल्या आहेत.

दहिसर-भाईंदर मेट्रोची सीएमआरएसकडून तपासणी; आतापर्यंत नऊ मार्गिकांवर प्राथमिक चाचण्या पूर्ण
मुंबई : दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो नऊ मार्गिकेवर सीएमआरएस प्राथमिक पथकाकडून चाचण्या पूर्ण केल्या आहेत. आता पुढील आठवड्यात या मेट्रो मार्गिकेवर अंतिम तपासणीसाठी कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी (सीएमआरएस) येणार असून, त्यांनी प्रमाणित करताच ही मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. १३.६ किमी मेट्रो मार्गिकेची लांबी असून, त्यावर १० स्थानके असतील.
त्यातून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही मेट्रो प्रवासी सेवेत येण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेची उभारणी केली जात आहे. पहिल्या टप्प्यात दहिसर ते काशीगावपर्यंतचा ४.४ किमीचा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल केला जाणार आहे. मेट्रोसाठी नुकतेच इंडिपेंडंट सेफ्टी अॅसेसमेंट (एएसए) प्रमाणपत्र एमएमआरडीएला मिळाले आहे. या मार्गिकेवर ११, १२ डिसेंबर रोजी सीएमआरएसने पाहणी केली आहे.
पहिल्या टप्प्यात या स्थानकांवर मेट्रो धावणार
१. दहिसर
२. पांडुरंग वाडी
३. मीरागाव
४. काशीगाव
मेट्रो ९ मार्गिका
लांबी - १३.६ किमी
स्थानके - १०
खर्च - ६६०७ कोटी रुपये,
मेट्रो मार्गांचे जाळे; नागरिकांचा प्रवास सुखकर
मेट्रो ७ आणि '७ अद्वारे आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट जोडणी.
मेट्रो दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो '२ अ' शी दहिसर येथे जोडली जाणार, तर डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो २ बी मार्गिकेवरून थेट मानखुर्दपर्यंत जाता येणार.
गायमुख ते शिवाजीचौक मेट्रो १० सोबत मौरागाव येथे जोडली जाणार.
तसेच भविष्यात वसई-विरार मेट्रो १३ मार्गिकेशी मीरा-भाईंदर येथील सुभाष चंद्र बोस स्थानकात जोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.