Join us  

चलो अयोध्या! उद्धव ठाकरे असंख्य शिवसैनिकांसह 7 मार्चला करणार अयोध्या दौरा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 1:32 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याचा निकाल लागल्यानंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याचा निकाल लागल्यानंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांचा 24 नोव्हेंबर रोजी नियोजित असलेला हा अयोध्या दौरा लांबणीवर पडला होता. आता, शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची पुन्हा घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येत जाणार असल्याची माहिती दिली आहे. 

उद्धव ठाकरे 7 मार्च रोजी असंख्य शिवसैनिकांसह अयोध्येला भेट देणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी ट्विट करत दिली आहे. राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नव्हता, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर पडला होता. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर अनेक राजकीय उलथापालथ घडल्याचे दिसून आलं. त्यामुळे राज्यात नवे सरकार स्थापन होण्यास विलंब झाला. या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना महाय़ुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून तिढा निर्माण झाल्याने शिवसेनेने भाजपाची साथ सोडली आणि राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केले होते.

दरम्यान, गतवर्षी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले होते. तसेच अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर रोजी दिला होता. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. हा दौरा 24 नोव्हेंबर रोजी नियोजित होता. मात्र. राज्यात सत्तास्थापनेस विलंब होत असल्याने हा दौरा लांबणीवर पडला होता. 

टॅग्स :उद्धव ठाकरेअयोध्यामहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्र विकास आघाडीशिवसेनासंजय राऊत