Join us
Daily Top 2Weekly Top 5

सभेला सभेनं प्रत्युत्तर! मुख्यमंत्री ठाकरेंची तोफ धडाडणार; ठिकाण अन् मुहूर्त ठरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 20:48 IST

मुख्यमंत्री ठाकरे विरोधकांचा समाचार घेणार; सभेला सभेनंच प्रत्युत्तर देणार

मुंबई: विरोधकांकडून सातत्यानं होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढील महिन्यात मुंबईत सभा घेणार आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलात १४ मे रोजी ठाकरेंची सभा होईल. त्याआधी उद्धव ठाकरे ३० एप्रिलला राज्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधतील. 

मशिदींवरील भोंगे, हनुमान चालिसा यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण तापलं आहे. भोंगे उतरवण्यावरून राज यांनी दिलेला अल्टिमेटम, भोंग्यांना हनुमान चालिसानं प्रत्युत्तर, किरीट सोमय्यांचं आरोपसत्र, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी दिलेलं आव्हान, त्यावरून त्यांच्यावर झालेली कारवाई, शिवसेनेनं हिंदुत्व सोडल्याची होत असलेली टीका या सगळ्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री काय बोलणार याबद्दल उत्सुकता आहे.

मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करत राज यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. १ मे रोजी राज यांची औरंगाबादमध्ये सभा होत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसदेखील १ मे रोजी मुंबईत पोलखोल सभा घेणार आहेत. शिवसेनेची हिंदुत्वावरून कोंडी करण्यासाठी भाजप, मनसेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे १४ मेच्या सभेत मुख्यमंत्री ठाकरे विरोधकांचा कशापद्धतीनं समाचार घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाभाजपाराज ठाकरे