Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंनी केलेली 'ती' सूचना ठाकरे सरकार अंमलात आणणार; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 22:50 IST

साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

मुंबई: साकीनाका परिसरात महिलेवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर उपचारादरम्यान झालेला तिचा मृत्यू यामुळे राज्य सरकारवर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी (काल) मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील महिला सुरक्षा तसंच महिला अत्याचार प्रतिबंधक उपाययोजना, महिला विषयक गुन्ह्यांचा आढावा घेतला.

'माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही. राज्यातील महिला सुरक्षित राहिल्याच पाहिजेत. यासाठी जे काही करता येईल, अशा उपाययोजनांबद्दल कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यासाठी गृह विभागाला पूर्ण पाठबळ देण्यात येईल. महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना वचक बसावा यासाठी जो काही संदेश द्यावा लागेल, त्यासाठी प्रयत्न करा', असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं. 

महाराष्ट्रात इतर राज्यांमधून येणाऱ्या लोकांचा गुन्हेगारी कृत्यांमध्ये असलेला सहभाग पाहता मुख्यमंत्र्यांनी याबद्दलही पोलीस अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. इतर राज्यातून येणाऱ्यांची नोंद ठेवावी लागेल. ते येतात कुठून जातात कुठे यांची माहिती ठेवावी लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांची नोंद ठेवली जाणार आहे.

राज ठाकरेंनी अनेकदा केली होती सूचनाराज्यात येणाऱ्या परप्रांतीयांची नोंद ठेवा. ते कुठून येतात, कुठे जातात याचा तपशील पोलिसांकडे असायला हवा, असं राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून म्हणत आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊन लागल्यानंतर राज्यातील लाखो परप्रांतीय त्यांच्या गावी परतले. त्यावेळीही राज ठाकरेंनी या मागणीचा पुनरुच्चार केला होता. परप्रांतीय मोठ्या संख्येनं त्यांच्या घरी परतले होते. परिस्थिती पूर्ववत झाल्यावर ते पुन्हा महाराष्ट्रात येतील. तेव्हा त्यांची नोंद ठेवा, असं राज यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :उद्धव ठाकरेराज ठाकरेसाकीनाका