Join us  

School Reopen in Maharashtra: आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पालकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2021 1:52 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी संवाद साधला व त्यांना शुभेच्छा दिल्या.

ठळक मुद्देकोरोनाने आपल्याला बरेच काही शिकविलेशाळा सुरू करण्याचा निर्णय कठीण आणि आव्हानात्मकमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी साधला विद्यार्थी, शिक्षकांशी संवाद

मुंबई: कोरोनाचे निर्बंध शिथील करून राज्यातील शाळांची प्रत्यक्ष सुरुवात आजपासून करण्यात आली. याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी संवाद साधला व त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले. (cm uddhav thackeray appeal to parents on school opening that you should take responsibility of children)

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मला माझे शाळेतले दिवस आठवताहेत. सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. पूर्वीचा दिवस वेगळेच असायचे. मित्रांना भेटण्याची उत्सुकता, नवीन वह्या पुस्तके, गणवेश मिळायचे, अशी आठवण सांगत आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा आव्हानात्मक काळ सुरू आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

शाळा सुरू करण्याचा निर्णय कठीण आणि आव्हानात्मक

शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे कठीण आणि आव्हानात्मक होतं आणि आहे. मुलं नाजूक असतात, त्यांचे वय घडण्याचे असते. आज आपण मुलांच्या विकासाचे , प्रगतीचे दार मुलांसाठी उघडतो आहोत. त्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. मी नेहमी या विषयावर टास्क फोर्सशी चर्चा करतो. आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या. शिक्षकाला बरे वाटत नसेल, तर त्याने लगेच चाचणी करून घ्यावी. पावसाळा अजून संपला नाही. साथीचे रोगही येतात. त्यामुळे प्रकृतीकडे लक्ष ठेऊन सर्वानी काम करावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 

कोरोनाने आपल्याला बरेच काही शिकविले

कोरोनाने आपल्याला बरेच काही शिकविले आहे. शाळांच्या खोल्यांची दारे बंद नको, हवा खेळती हवी, निर्जंतुकीकरण करून घ्या. निर्जंतुकीकरण करतांना देखील काळजी घ्या. मुलांच्या बसण्यात अंतर ठेवणे, मास्क घालणे, स्वच्छतालयांची स्वच्छता हवी. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विदयार्थी, शिक्षक, पालक यांना शुभेच्छा देतो. मुलांची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. ती निश्चितपणे पार पडली जाईल, असा मला विश्वास आहे. एकदा उघडलेली शाळा परत बंद करायची नाही या निर्धाराने शिक्षण सुरू ठेवू, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी नमूद केले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशाळामहाराष्ट्रमुंबईराज्य सरकार