Join us

राहुल शेवाळेंवर शोषणाचा आरोप करणाऱ्या महिलेचं CM पत्र; पत्नी म्हणाली, हे तर षड्यंत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 18:50 IST

Rahul Shewale : खासदार शेवाळे यांच्या पत्नीने आपल्या पतीची पाठराखण करत महिलेने केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर देत खंडण केले आहे. प्रसिद्धी पत्रक काढत त्यांनी माहिती दिली आहे.

मुंबई : शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी एका महिलेविरुद्ध खंडणी, फसवणूक आणि सार्वजनिक प्रतिमा बदनाम केल्याप्रकरणी साकीनाका पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यांनी याप्रकरणी अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात धाव घेतल्यावर साकीनाका पोलिसांना महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे  निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर आता महिलेने आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे न्यायासाठी पत्र लिहिले आहे. "माझी विनंती ऐकली नाही आणि पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही तर आपल्यासमोर आयुष्य संपवण्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही," असं या महिलेने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. तसेच खासदार शेवाळे यांच्या पत्नीने आपल्या पतीची पाठराखण करत महिलेने केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर देत खंडण केले आहे. प्रसिद्धी पत्रक काढत त्यांनी माहिती दिली आहे. 

शेवाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची  फेब्रुवारी २०२० मध्ये जवळच्या मैत्रिणीमार्फत रिंकी गोडसन बाक्सला नावाच्या महिलेशी भेट झाली. शेवाळे यांना ती एक व्यावसायिक महिला असल्याचे सांगण्यात आले, परंतु कोविड-१९ मुळे तिचा व्यवसाय ठप्प झाला होता आणि तिला काही आर्थिक मदतीची गरज होती. ती त्यांना भेटण्यासाठी मेसेज आणि फोन कॉल्स करत होती. काही महिन्यांनंतर शेवाळे यांनी महिलेला आर्थिक मदत केली, मात्र नंतर ती आणखी पैशांची मागणी करू लागली, असे तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे. माझा मदतीचा स्वभाव असल्याने आरोपीने त्याचा गैरफायदा घेतला आणि अधिक पैशांसाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. मी आरोपीला नम्रपणे नाही म्हणण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने माझ्याकडून आणखी पैसे हडप केले. त्यानंतर तिने मला धमकावणे आणि ब्लॅकमेल करणे सुरू केले. 

मी नकार दिल्यावर तिने माझ्याशी अवैध संबंध असल्याचे दाखवून बदनामी करण्याची धमकी दिली. शेवाळे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खंडणी घेतल्यानंतर, महिलेने सोशल मीडियावर आपले त्यांच्याशी संबंध असल्याचे सांगण्यास सुरुवात केली आणि शेवाळे यांना धमकी दिली की त्यांनी त्यांच्या पत्नीला घटस्फोट देऊन तिच्याशी लग्न केले तरच ती हे सर्व प्रकार थांबवेल.

महिलेने पत्रात काय लिहिलं आहे?

तक्रारदार महिलेने एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे की, "खासदार राहुल शेवाळे लग्नाच्या बहाण्याने 2020 पासून आपल्यावर बलात्कार करत असून मानसिक त्रास देत आहेत. शेवाळे आणि पत्नीचा कधीही घटस्फोट होऊ शकतो. आमच्या दोघांमध्ये काहीही ठीक नाही, असं राहुल शेवाळे यांनी आपल्याला सांगितलं. शेवाळे यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत आपण त्यांचा प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारला," असंही या महिलेने सांगितलं.

दरम्यान राहुल शेवाळे यांच्यावरील आरोपांनुसार, "शेवाळे आणि संबंधित महिला हे दिल्लीतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी अनेकदा भेटले होते. राहुल शेवाळे या महिलेला जेवणासाठी बोलवायचे आणि लग्नाचे आश्वासन देऊन तिचे शारीरिक संबंध ठेवत असत."

पत्नीने केली पाठराखण 

खासदार शेवाळे यांच्या पत्नीने केलेल्या आरोपांच्या खानदानानुसार, खासदार राहुल शेवाळे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन जे आरोप सुरू आहेत, ते पूर्णतः निराधार आहेत. सामाजिक आणि राजकीय जीवनात गेल्या २५ वर्षांहून जास्त काळ कार्यरत असणाऱ्या लोकप्रतीनिधीची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचे हे षडयंत्र आहे. आरोप करणाऱ्या महिलेने गेल्या काही महिन्यांपासून मला आणि माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. खंडणी वसूल करण्याच्या इराद्याने धमकावणे, प्रतिष्ठित व्यक्तीची प्रतिमा मलिन करणे यासाठी सदर महीले विरोधात शारजा, दुबई येथे देखील काही महिन्यांपूर्वी गुन्हा नोंदविण्यात आला होता आणि तिला सुमारे ८० दिवसांचा तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. तसेच सदर महिलेच्या कुटुंबाची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारी स्वरूपाची आहे. एका महिलेचा बलात्कार करून खून केल्याप्रकरणी सदर महिलेचा भाऊ दिल्लीतील तुरुंगात शिक्षा भोगत असल्याची देखील माहिती आहे.

प्रसिद्धी माध्यमांना मी नम्र विनंती करते की, खासदार राहुल शेवाळे यांची राजकीय आणि सामजिक प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी जाणीवपूर्वक रचले गेलेले हे षडयंत्र असून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने याबाबतच्या कोणत्याही निराधार, एकतर्फी आणि खोट्या वृत्तांची दखल घेऊ नये. तसेच या प्रकरणी कोणतेही वृत्त प्रसारित करताना माझ्याशी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधून आमची बाजू देखील मांडली जाईल, अशी आशा बाळगते! असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :राहुल शेवाळेपोलिसलैंगिक शोषणलैंगिक छळन्यायालयखासदार