Join us

“PM मोदींचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलरची भर टाकेल”: CM शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 17:31 IST

CM Eknath Shinde: महाराष्ट्राला रेल्वेसाठी १३,५०० कोटी रुपये कधीही मिळाले नव्हते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

CM Eknath Shinde: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर आले. या दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस या दोन रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवला. सीएसएमटी स्थानकावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदर रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवला असून यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलरची भर टाकेल, असे आश्वासन दिले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. तसेच त्यांच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलरची भर टाकेल, असे आश्वासन दिले. सर्वप्रथम रेल्वे मंत्र्यांचे मनापासून धन्यवाद देतो. या दोन्ही ट्रेनचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान उपस्थित आहेत. मी तुमचे अभिनंदनही करतो गेल्या आठवड्यात झालेल्या ग्लोबल सर्व्हेमध्ये आपले पंतप्रधान एक नंबरवर आहेत. ही देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

महाराष्ट्रातीला रेल्वेला १३,५०० कोटी कधीही मिळाले नव्हते

मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या दोन वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण झाले. हे महाराष्ट्रासाठी मोठे पाऊल आहे. रेल्वेचे सर्वात मोठे नेटवर्क आहे, गेल्या अनेक काळापासून हा विभाग दुर्लक्षित होता. या विभागाने गेल्या ९ वर्षात गरिबांपासून सर्वांच्या फायद्याचे लक्ष दिले. महाराष्ट्राला १३,५०० कोटी रुपये कधीही मिळाले नव्हते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. 

दरम्यान, अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले, अशी विचारणा काही लोक करतात. मात्र, त्यांनी अर्थसंकल्प नीट वाचलेला नाही. रेल्वेमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच एवढी मोठी रक्कम रेल्वेसाठी देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :एकनाथ शिंदेवंदे भारत एक्सप्रेस