शिंदे गटात प्रवेश करताच मनिषा कायंदे यांना महत्त्वाची जबाबदारी; CM एकनाथ शिंदेंची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 10:00 IST2023-06-19T09:58:52+5:302023-06-19T10:00:09+5:30
Manisha Kayande Shiv Sena Shinde Group: शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेची या पदावर नियुक्ती आली. पक्षविस्तार करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

शिंदे गटात प्रवेश करताच मनिषा कायंदे यांना महत्त्वाची जबाबदारी; CM एकनाथ शिंदेंची घोषणा
Manisha Kayande Shiv Sena Shinde Group: शिवसेनेचा वर्धापन दिन शिंदे गट आणि ठाकरे गटाकडूनही साजरा केला जात आहे. मात्र, वर्धापनदिनाच्या आधीच ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. मनिषा कायंदे आणि शिशिर शिंदे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्याची माहिती आहे. पैकी मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटावर टीका केली. गेल्या वर्षभरात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात होत असलेला बदल आणि त्यांच्या कामाची गती पाहूनच आपण एकनाथ शिंदे यांच्या ओरिजनल शिवसेनेत प्रवेश केला. केवळ दोषारोप करणे आणि लोक पक्ष सोडून का जात आहेत, याचे आत्मपरीक्षण न करणे, अशी अनेक कारणे आहेत, असे सांगत यापुढेही अनेक जण इकडे येतील, कारण त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास आहे. भविष्यातही ठाकरे गटातून शिंदे गटात महिलांचे प्रवेश होतील, असे मनिषा कायंदे यांनी म्हटले आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मनिषा कायंदे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी प्रा.मनिषा कायंदे यांचे पक्षात स्वागत करून भावी कारकिर्दीकरता शुभेच्छा देत त्यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली असून पक्षाचा विस्तार करण्यासाठी तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा यावेळी मनिषा कांयदे यांच्याकडे व्यक्त केली, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
दरम्यान, मुंबईतील चुनाभट्टी भागातील माजी अपक्ष नगरसेवक विजय तांडेल, त्यांची पत्नी सान्वी विजय तांडेल यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले. तसेच त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासह चुनाभट्टी भागातील असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.