Join us

आजचा दिवस हा तमाम शिवसैनिकांसाठी काळा दिवस; गांधी-ठाकरे सभेवर CM शिंदे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 17:09 IST

उद्धव ठाकरे हे गर्व से कहो हम हिंदू है हे आता कोणत्या तोंडाने म्हणणार असा सवाल शिंदे यांनी विचारला.

मुंबई - ज्या शिवतीर्थावरून बाळासाहेबानी संपूर्ण हिंदुस्थानाला मार्गदर्शन केलं. त्यांच्या वारसदाराने त्याच शिवतीर्थावर ज्यांनी  स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला त्या राहुल गांधी यांच्या मांडीला मांडी लावून बसायची वेळ आणली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावरील सभेवर दिली आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, खरं तर राहुल गांधी यांनी सर्वप्रथम सावरकर स्मारकात जाऊन अभिवादन करायला हवे, कारण सावरकर ही देशाची अस्मिता आहे. त्यांच्यावर वाट्टेल ते आरोप करणं, त्याना शिव्या शाप देणे हे कोणतं हिंदुत्व आहे..? आणि सावरकरांचा होत असलेला अपमान निमूटपणे सहन करणे हे शिवसैनिकांचे दुर्दैव आहे. उद्धव ठाकरे हे गर्व से कहो हम हिंदू है हे आता कोणत्या तोंडाने म्हणणार असा सवाल शिंदे यांनी विचारला. त्यामुळे आजचा दिवस हा शिवसेना आणि शिवसैनिकांसाठी काळा दिवस आहे असं शिंदे संतापून म्हणाले. आमदार आमश्या पाडवी हे ठाकरे गटातून शिंदेंच्या शिवसेनेत आले. या कार्यक्रमात शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोले लगावले. 

तसेच ज्या काँग्रेसला बाळासाहेबानी कायम दूर ठेवले त्यांच्यासोबत बसायची वेळ आली तर मी माझं दुकान बंद करेन असं मत व्यक्त केलं होतं. तेच आज सत्तेसाठी, खुर्चीसाठी, मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्याजवळ जाऊन बसले आहेत. जे आपल्या देशाची बदनामी परदेशात जाऊन करतात, पंतप्रधानांची बदनामी विदेशात जाऊन करतायत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे हे दुर्दैव असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

भारत जोडो न्याय यात्रेची सांगता शनिवारी मुंबई इथं झाली. त्यानंतर रविवारी दादरच्या शिवाजी पार्क मैदानात राहुल गांधींची सभा पार पडणार आहे. राहुल गांधीच्या या सभेला इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख नेते हजर असतील. त्यात प्रामुख्याने उद्धव ठाकरेंची उपस्थिती लक्षणीय असेल. मात्र याच उपस्थितीवरून विरोधकांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेएकनाथ शिंदेराहुल गांधी