“सुनील प्रभू आमच्याकडे येता येता राहिले”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 22:36 IST2024-09-03T22:34:27+5:302024-09-03T22:36:31+5:30
CM Eknath Shinde News: मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांच्याविषयी मोठे विधान केले.

“सुनील प्रभू आमच्याकडे येता येता राहिले”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
CM Eknath Shinde News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाच्या चर्चांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणुका जाहीर होतील, तसेच मतदान आणि निकाल नोव्हेंबरमध्ये लागतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यातच राज्यात अनेक घडामोडी सुरू आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते 'उत्कृष्ट संसदपटू' व 'उत्कृष्ट भाषण' पुरस्कारांचे वितरण राज्याच्या विधिमंडळात करण्यात आले. यावर्षी गेल्या ५ वर्षातील ५३ पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी केले. या समारंभास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य तसेच माजी आजी सदस्य, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित केलेल्या भाषणात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत विधान केले.
सुनील प्रभू आमच्याकडे येता येता राहिले
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सुनील प्रभू पण आहेत. ते आमच्याकडे येता येता राहिलेले आहेत. या सन्मानार्थींमध्ये प्रवीण दरेकर आहेत. दिवंगत विनायक मेटे आहेत. विनायक मेटे यांनाही हा पुरस्कार दिला आहे. त्यांच्या पत्नींनी तो स्वीकारला. त्यांनी खूप काम केले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे बोलताना सांगितले.
सुनील प्रभू यांनी केला पलटवार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानावर सुनील प्रभू यांनी पलटवार केला. भाषणात विनोद, कोट्या केल्या जातात. शेवटी माझी निष्ठा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आहे. मातोश्रीशी आहे. ती सिद्ध करण्यासाठी इतर कुणाची गरज नाही. माझा आत्मा आणि मी जीवनाच्या अंतापर्यंत मी उद्धव ठाकरेंसोबत आहे, हे सांगायला इतर ज्योतिषांची गरज नाही.