Join us  

मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल; मुख्यमंत्री संध्याकाळी दिल्लीला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 12:41 PM

भाजपा अध्यक्ष अमित शहांसोबत तातडीची बैठक

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपा अध्यक्ष अमित शहांनी तातडीनं दिल्लीला बोलावलं आहे. त्यामुळे आज संध्याकाळी फडणवीस दिल्लीला रवाना होणार आहेत. या बैठकीत मंत्रिमंडळ फेरबदलाबद्दल चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळातील फेरबदलाचा विषय गेल्या काही दिवसांपासूरन रेंगाळला आहे. यासाठी भाजपा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावलं आहे. दसऱ्यानंतर मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत अमित शहांची भेट घेणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करताना भाजपाच्या काही निष्क्रिय मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो. याशिवाय शिवसेनेला खूष करण्यासाठी दोन ते तीन मंत्रिपदं दिली जाऊ शकतात, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. भाजपाच्या कोट्यातील पाच जागा अजून भरायच्या आहेत आणि पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे कृषिमंत्रीपदही रिक्त आहे. तर, शिवसेना नेते दीपक सावंत यांनी जून महिन्यात आरोग्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्यानं एक जागा शिवसेनेच्या हक्काची आहे. परंतु, त्यांना अधिकच्या दोन जागा देऊन भाजपा 'मातोश्री'ची नाराजी दूर करेल, असा अंदाज आहे.

पितृपक्ष संपल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु, आता या विस्तारासाठी दसऱ्यानंतरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे कुणाची दिवाळी 'शुभ' होणार आणि कुणाचा 'फटाका फुटणार', याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी कंपनीद्वारे एक सर्वेक्षण करून घेतलं. आपले मंत्री, आमदार, खासदार किती पाण्यात आणि किती खोलात आहेत, याची चाचपणी त्यांनी केली आहे. या सर्वेक्षणाच्या आधारेच ते आपली नवी टीम निवडतील. स्वाभाविकच, 'मिशन लोकसभा' आणि नंतरच्या विधानसभा निवडणुकींची मोर्चेबांधणी करण्यासाठी जात, प्रदेश, भाषा या गोष्टी विचारात घेऊन मंत्र्यांची निवड केली जाईल, याकडे जाणकारांनी लक्ष वेधलं.

शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिला असला, नरेंद्र-देवेंद्र सरकारवर रोज टीकेचे बाण सोडले जात असले, तरी भाजपाकडून 'लोकसभा-विधानसभा पॅकेज डील' दिलं गेल्यास ते युतीसाठी तयार होऊ शकतात. विरोधक एकत्र मैदानात उतरण्याची चिन्हं असल्यानं भाजपालाही आपल्या या जुन्या मित्राची गरज भासणारच आहे. त्यांना गोंजारण्यासाठी अगदी वरिष्ठ पातळीपासून फोनाफोनी झाल्याचं अलीकडच्या काळात पाहायला मिळालं होतं. आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्तानं भाजपा 'मास्टरस्ट्रोक' लगावण्यासाठी सज्ज आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपाशिवसेनाउद्धव ठाकरेअमित शाह