Join us

“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 17:16 IST

CM Devendra Fadnavis: तुमच्या काळामध्ये पहिली ते बारावी हिंदी सक्तीचा निर्णय का घेण्यात आला, असा प्रश्न राज ठाकरे यांनी एकदा तरी उद्धव ठाकरे यांना विचारावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

CM Devendra Fadnavis: दोन भावांनी एकत्र येऊ नये, असा मी जीआर काढला आहे का? असा मी जीआर काढलेला नाही. दोन भाऊ एकत्र येत असतील, तर मला अतिशय आनंद आहे. त्यांनी जरूर एकत्रित यावे. तुमच्या काळामध्ये पहिली ते बारावी हिंदी सक्तीचा निर्णय का घेण्यात आला, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारावा. बाकी त्यांनी एकत्रित यावे, क्रिकेट खेळावे, हॉकी खेळावे, टेनिस खेळावे, स्विमिंग करावे, जेवण करावे, आम्हाला काहीही हरकत नाही, असा खोचक टोला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी रविंद्र चव्हाण यांनी अर्ज भरला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता किरण रिजिजू याबाबत अधिकृत घोषणा करणार आहेत. अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना टोलेबाजी केली. तसेच मराठी भाषा आणि हिंदी सक्तीवरून विरोधकांकडून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांचा समाचार घेतला.

उद्धव ठाकरे यांनी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे घुमजाव केले

उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात जो अहवाल आला होता, तो येण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा उजवा हात असलेल्या उपनेत्याची महत्त्वाची भूमिका होती. त्या अहवालात पहिली ते बारावी हिंदी सक्तीची करा, असे म्हटले होते. तो अहवाल उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला. त्यानंतर नेहमीच्या पद्धतीने घुमजाव केले. तरी आम्ही कोणताही इगो न मानता त्यासंदर्भात निर्णय केलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो की, आम्ही निर्णय केला आहे. समिती तयार केलेली आहे. समिती ठरवेल. आम्ही कोणत्याही पक्षाचे हित बघणार नाही. आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे हित बघू. विद्यार्थ्यांच्या हिताचे जे असेल, तोच निर्णय महाराष्ट्र सरकार घेईल. कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

कोकणातील कानाकोपऱ्यात आमचे संघटन उभे राहील

कोकणात आमचा विस्तार अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे. या विस्तारात रविंद्र चव्हाण यांचा विशेष मोलाचा वाटा आहे. रविंद्र चव्हाण यांचे काम केवळ कोकणापुरते मर्यादित नाही, संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे काम आहे. महामंत्री म्हणून महाराष्ट्रात काम केले आहे. कोकणात आम्हाला विस्तार करण्यासाठी आणखी खूप वाव आहे. अर्थात आमची महायुती असल्यामुळे काही ठिकाणी आम्हाला मर्यादा आहेत. काही जागा आम्हाला लढता येत नाहीत. परंतु, आम्हाला संघटन वाढवायला आम्हाला मनाई नाही. कोकणातील कानाकोपऱ्यात आमचे संघटन उभे राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, रविंद्र चव्हाण यांची भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड निश्चित मानली जाते आहे. मंगळवारी यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली जाईल. आम्ही सगळ्यांनी त्यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे आणि त्यांचा अर्ज पक्षश्रेष्ठींकडे सोपवला आहे, अशी माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविंद्र चव्हाण यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढले.

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेरविंद्र चव्हाणभाजपा