Join us

“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 20:52 IST

CM Devendra Fadnavis News: आम्ही बोलबच्चन भैरवी नाही. मोठी भाषणे करायची आणि कर्तृत्वशून्य आम्ही नाही. ये पब्लिक हैं, सब जानती हैं, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

CM Devendra Fadnavis News:मुंबईसह राज्यातील महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा कट सुरू झाला आहे, अशी भाषणे आता सुरू होतील. अशीच भाषणे सगळ्यांना ऐकायला मिळतील. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, तुमच्यात ही ताकद नाही आणि कुणाच्या बापामध्ये ही ताकद नाही की, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकाल. भाजपाचे सरकार आल्यानंतर मुंबईचा चेहरा आम्ही बदलून दाखवला, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. 

मुंबईतील वरळी येथे भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली. यावेळी भाजपाचे राज्यभरातील अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय पातळीवरील नेतेही उपस्थित होते. हजारो कार्यकर्तेही या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. उद्धव ठाकरेंनी भाजपाचा उल्लेख अफवांची फॅक्टरी असा केला होता. त्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. 

निवडणुका आल्यानंतर या लोकांना मराठी माणूस आठवतो

मुंबई महानगरपालिका म्हणजे सोन्याचे अंड देणारी कोंबडी समजून तुम्ही अंडी खात राहिलात आणि शेवटी ती कोंबडी चिरण्याचे कामही तुम्ही केले. मुंबईतील मराठी माणसाला, गिरगावातल्या मराठी माणसाला हद्दपार करण्याचे काम तुम्ही केले. तुम्ही केवळ मराठीच्या नावावर राजकारण करत राहिला. मराठी माणसाला घर देणारे आम्ही आहोत. अभ्युदय नगर, बीडीडी चाळ या ठिकाणी राहणाऱ्या मराठी माणसाला घर देणारे आम्ही आहोत. निवडणुका आल्यानंतर यांना मराठी माणूस आठवतो. कुणाची युती झाली पाहिजे, कुणाची अयुती झाली पाहिजे यासाठी राजकारण करणारे आम्ही नाही. महाराष्ट्राचे हित झाले पाहिजे म्हणून आम्ही राजकारण करतो आहोत. आम्ही परिवर्तन घडवण्यासाठी सत्ता हातात घेतली आहे. आम्ही बोलबच्चन भैरवी नाही. मोठी भाषणे करायची आणि कर्तृत्वशून्य आम्ही नाही. ये पब्लिक है सब जानती है, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

विकसित महाराष्ट्र करुन दाखवू

महायुतीचे तीनही पक्ष नवा महाराष्ट्र घडवायचा निघालो आहोत. पंतप्रधान मोदींच्या विकसित भारताचे स्वप्न आहे, त्याबरोबर विकसित महाराष्ट्र करून दाखवू. महाराष्ट्रात राहणाऱ्या युवांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, शेतकरी समृद्ध झाला पाहिजे यासाठी आम्ही १६ लाख कोटींचे करार करून आम्ही महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणले. या देशात जी थेट विदेशी गुंतवणूक येते त्यात पहिल्या क्रमांकावर आम्ही महाराष्ट्राला आणून दाखवले. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र किंवा कुठलाही भाग असो दुष्काळाला भूतकाळ करण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. २०१४ नंतर जी-जी गोष्ट सांगितली, तरी करून दाखवली आहे, हे जनतेला माहिती आहे. फेक नरेटिव्ह तयार करणारी फॅक्टरी अजून थांबलेली नाही. लोकसभेला फेक नरेटिव्हच्या मदतीने यांनी एक यश मिळवले पण विधानसभेला आपण त्यांना थेट नरेटिव्हने उत्तर दिले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकायचे इंग्रजीला पायघड्या अन् भारतीय भाषांना विरोध करायचा

देशात त्रिभाषा सूत्र आल्यानंतर ते सूत्र कसे स्वीकारले पाहिजे, यासाठी उद्धव ठाकरेंच्या सरकारने समिती तयार केली. समितीचा अहवाल आला. त्यात सांगण्यात आले होते की, पहिली ते बारावी ते हिंदी अनिवार्य करा. उद्धव ठाकरेंनी नेमलेल्या समितीने हे सांगितले. तो अहवाल उद्धव ठाकरेंच्या कॅबिनेटने स्वीकारला. त्यावर उद्धव ठाकरेंनी सही केली. आपल्या सरकारने तिसऱ्या भाषेने निर्णय केला की, हिंदी किंवा कुठलीही भाषा शिकता येईल. यानंतर यांनी हिंदी सक्तीचे बोलणे सुरू केले. मराठीची सक्तीच फक्त महाराष्ट्रात आहे. भारतातील प्रत्येक भाषेचा आम्हाला अभिमान आहे. हिंदीचा विरोध करुन इंग्रजीला पायघड्या घालणारे आम्ही नाहीत. बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकायचे, इंग्रजीला पायघड्या आणि भारतीय भाषांना विरोध करायचा हे आम्ही सहन करणार नाही. आम्ही समिती तयार केली आहे. मराठी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ. कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपापोलिसमुंबई