CM Devendra Fadnavis Replied Congress MP Rahul Gandhi: काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधाने करताना पाहायला मिळतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानांवरून राहुल गांधी यांच्याविरोधात देशातील न्यायालयांमध्ये याचिकाही दाखल करण्यात आलेल्या आहेत. यातच सर्वोच्च न्यायालयात झालेल्या एका सुनावणीदरम्यान राहुल गांधी यांना खडेबोल सुनावत स्पष्ट शब्दांत इशारा देण्यात आला आहे. यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिखट शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला. वीर सावरकरांसारख्या व्यक्तींनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि तुम्ही त्यांना अशी वागणूक देता. भविष्यात कधीही अशी टिप्पणी करू नका अन्यथा न्यायालय स्वतः त्याची दखल घेईल, असा इशारा देत, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेले विधान हे बेजबाबदारपणाचे होते आणि त्यांनी असे बोलायला नको होते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याचे सांगितले जात आहे. पत्रकारांशी बोलताना यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
हातात लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना जोरदार चपराक लगावणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यसैनिकांचे अपमान करतात. तसेच ज्या भाषेत राहुल गांधी टीका करतात, त्यामुळे संपूर्ण देशवासीयांचे मन दुखावले गेले. लाल संविधान हातात घेऊन फिरणारे राहुल गांधी आता तरी कमीत कमी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करतील आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल उलट-सुलट विधाने करणे थांबवतील, अशी अपेक्षा आहे, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानावरून फटकारले. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बेजबाबदार विधाने करू नयेत. खुद्द महात्मा गांधी यांनीही सावरकरांचा सन्मान केला आहे. एवढेच नाही तर, इंदिरा गांधी यांनीही त्यांना पत्र लिहिले होते. स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास समजून घेतल्याशिवाय आपण अशा प्रकारची विधाने करू शकत नाही, असे सांगत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या विधानासंबंधी मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांना जारी केलेले समन्स रद्द करण्यास नकार देणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.