CM Devendra Fadnavis News: भारत आणि अमेरिकेत टॅरिफवरून तणाव सुरूच आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या संबंधांबद्दल एक मोठे विधान केले. भारत आणि अमेरिकेतील संबंध खूप खास आहेत. सध्या तणाव असूनही, मोदी आणि मी कायम मित्र राहू. ते एक उत्तम पंतप्रधान आहेत. ते महान आहेत. पण सध्या ते जे करत आहेत, ते मला आवडत नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
भारत रशियाकडून खूप तेल खरेदी करत आहे याबद्दल ते खूप निराश आहेत. आपण भारतावर खूप टॅरिफ लादला आहे, सुमारे पन्नास टक्क्यांचा आकडा आपण गाठला आहे. पण तो वेगळा विषय आहे. पंतप्रधान मोदींशी माझे संबंध चांगले आहेत. ते खूप चांगले आहेत. ते काही महिन्यांपूर्वी येथे आले होते. ते माझे कायमस्वरूपी मित्र आहेत, असेही ट्रम्प यांनी सांगितले. भारतात गणेश विसर्जन सुरू आहे. भावपूर्ण वातावरणात लाडक्या गणपतीला निरोप दिला जात आहे. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणपतीचे विसर्जन केले. यावेळी ट्रम्प यांनी केलेल्या विधानाबाबत पत्रकारांनी फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली.
PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो
यात कोणतेही दुमत नाही. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही गोष्ट नमूद केली असली तरी ठीक आहे. त्यांनी तसे केले नसते, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वोत्तमच होते. पंतप्रधान मोदी यांना जगभरातील राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान ग्रेटच मानतात. मला असे वाटते की, कोणी कौतुक करत आहे, तर कोणी टीका करत आहे, हे जे अमेरिका ज्या पद्धतीने वागत आहे, त्यांना एवढेच सांगेन की, हा नवीन भारत आहे. पंतप्रधान मोदी यांचा भारत आहे. हा भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सक्षम आहे. जे आमच्या सोबत आहेत, त्यांना बरोबर घेऊन पुढे जाऊ. जे आमच्या सोबत नाही, त्यांच्या शिवाय भारत विकसित राष्ट्र बनेल, असा दृढ विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे व्यक्त केला.
दरम्यान, ट्रम्प यांच्या या भूमिकेवर आता पंतप्रधान मोदी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांच्या या सकारात्मक भावनांचे आणि दोन्ही देशांतील संबंधांबद्दलच्या सकारात्मक मूल्यांकनाचे आम्ही मनापासून कौतुक करतो, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात एक अत्यंत सकारात्मक आणि दूरगामी, व्यापक तसेच जागतिक रणनीतिक भागीदारी असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.