CM Devendra Fadnavis on Assembly Fight: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनाच्या लॉबीतच जोरदार हाणामारी झाली. गेल्या दोन दिवसांपासून जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या धुसफूस सुरुच होती. त्यानंतर गुरुवारी दोघांचेही कार्यकर्ते विधानभवनात भिडल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झालं. त्यानंतर या घटनेची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. विधानसभेत मारामारी करणं योग्य नसल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे कारवाईची मागणी केली आहे.
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून शाब्दिक खटके उडत होते. मात्र आज दोघांचेही कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. विधिमंडळातच कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीत झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोष व्यक्त केला आहे. विधिमंडळात अशा घटना घडणं बिलकुल योग्य नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
"घडलेली घटना अतिशय चुकीची आहे. अशा प्रकारची घटना घडणं हे बिलकुल योग्य नाही. या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांच्या अंतर्गत हा सगळा परिसर येतो. त्यामुळे सभापती आणि अध्यक्षांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. यासंदर्भात जी काही कडक कारवाई करावी अशी विनंती मी अध्यक्षांकडे केली आहे. या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात हे या विधानसभेला शोभणार नाही. म्हणून याच्यावर निश्चित कारवाई झालीच पाहिजे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
मला मारण्यासाठी गुंड आले होते - जितेंद्र आव्हाड
"पहिल्यांदा पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. विधानसभेत गुंडाना प्रवेश देणार असाल तर आमचे लोक सुरक्षित नाहीत. माझ्यावर अश्लाघ्य टीका करण्यात आली. मी सभागृहात भाषण केल्यानंतर मोकळी हवा खाण्यासाठी बाहेर आलो असता माझ्यावर थेट हल्ला करण्यात आला. ते गुंड मलाच मारण्यासाठी आले होते," असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.