“स्वातंत्र्यवीर सावरकर केवळ एक नाव नाही; एक विचार, अख्खी संस्था!”: CM देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 10:56 IST2025-05-28T10:54:29+5:302025-05-28T10:56:24+5:30

CM Devendra Fadnavis: इंग्रजांनी चुकीने काढून घेतलेली सावरकरांची बॅरिस्टर पदवी मरणोत्तर परत मिळवण्यासाठी राज्य शासन इंग्लंडमधील संस्थांशी संपर्क साधणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

cm devendra fadnavis inaugurated the swatantryaveer vinayak damodar savarkar centre for research and studies at mumbai university | “स्वातंत्र्यवीर सावरकर केवळ एक नाव नाही; एक विचार, अख्खी संस्था!”: CM देवेंद्र फडणवीस

“स्वातंत्र्यवीर सावरकर केवळ एक नाव नाही; एक विचार, अख्खी संस्था!”: CM देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis: मुंबई विद्यापीठाच्या परिसरात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्रा’च्या उद्घाटनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या केंद्राच्या माध्यमातून आता सावरकरांचे विचार, कार्य आणि क्रांतीशील धग अभ्यासकांसाठी नव्या उंचीवर नेली जाणार आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सावरकर हे केवळ एक नाव नाही, ते एक विचार आहेत, एक संस्था आहेत, एक अखंड ज्वाला आहेत. अत्यंत तरुण वयात ‘स्वातंत्र्य माझे ध्येय’ अशी शपथ घेऊन त्यांनी क्रांतीच्या महासागरात उडी घेतली. अभिनव भारत, लंडनमधील इंडिया हाऊस, जोसेफ मॅझिनीचे आत्मचरित्र, ही केवळ स्थळं व ग्रंथ नव्हते तर ती क्रांतीची प्रयोगशाळा होती, ज्यामध्ये सावरकरांनी देशप्रेमाची आग पेटवली. आपल्या लेखणीतून त्यांनी तरुणांच्या मनात स्वतंत्रतेची ज्योत चेतवली. म्हणूनच इंग्रज सत्ताधाऱ्यांना सावरकरांचा उल्लेख ‘सर्वांत धोकादायक क्रांतिकारक’ असा करावा लागला.

सावरकर हे सामाजिक क्रांतीचे अग्रदूतही होते

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, १८५७ च्या उठावाला ‘भारतीय स्वातंत्र्याचा पहिला संग्राम’ असे नवे परिमाण देत सावरकरांनी ब्रिटिशांनी खोटेपणाने लिहिलेला इतिहास नव्याने देशवासियांसमोर आणला तसेच आणि अंदमानच्या काळकोठडीत, दुहेरी जन्मठेपेच्या छायेत, त्यांनी लिहिलेले ‘अनादि मी, अनंत मी’ हे गीत आजही देशप्रेमाची अमर प्रेरणा बनून उठते. सावरकरांच्या विचारांना बेड्या घालणे शक्यच नव्हते. त्यांच्या आत्मबलामुळेच त्यांनी ११ वर्षांचा काळ कोठडीतील अंधार प्रकाशमान केला. सावरकर हे सामाजिक क्रांतीचे अग्रदूतही होते. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत महाड येथील चवदार तळ्याच्या लढ्यात त्यांनी साक्ष देऊन सामाजिक समतेचा इतिहास घडवला. मराठी भाषेला नवे शब्द देत तिला समृद्ध करणाऱ्या सावरकरांची साहित्यसेवा देखील अमूल्य आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

दरम्यान, या संशोधन केंद्राला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. तसेच इंग्रजांनी चुकीने काढून घेतलेली सावरकरांची बॅरिस्टर पदवी मरणोत्तर परत मिळवण्यासाठी राज्य शासन इंग्लंडमधील संस्थांशी संपर्क साधणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिले. उद्घाटन सोहळ्याला मंत्री चंद्रकांत पाटील, अ‍ॅड. आशिष शेलार, कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

Web Title: cm devendra fadnavis inaugurated the swatantryaveer vinayak damodar savarkar centre for research and studies at mumbai university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.