दुबईत अडकलेल्या मराठी लोकांना परत आणायला सरकार काय करतंय?; CM फडणवीसांनी A टू Z माहिती दिली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 14:56 IST2026-03-04T14:51:04+5:302026-03-04T14:56:04+5:30
CM Devendra Fadnavis Vidhan Parishad News: परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना परत मायदेशात आणण्यासाठी सरकारच्या वतीने काय प्रयत्न सुरू आहेत, याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दुबईत अडकलेल्या मराठी लोकांना परत आणायला सरकार काय करतंय?; CM फडणवीसांनी A टू Z माहिती दिली
CM Devendra Fadnavis News: इराण आणि इस्रायल यांचे युद्ध सुरू झाल्यानंतर एअर स्पेस बंद झाली. भारतीय पर्यटक किंवा व्यवसायासाठी जे लोक गेले त्यांचे मेसेज आपल्याला येऊ लागले. त्यानंतर केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क केला. दूतावासाशी संपर्क करायला सांगितले. आपल्या राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आहेत, त्यांना ती जबाबदारी दिली आहे. आपण व्हॉट्सअप नंबर दिला आहे, तिथल्या लोकांच्या अडचणी दूर करतो आहोत. अडकलेल्या लोकांना परत आणण्याचे प्रयत्नही आपण सुरू केले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
मध्यपूर्वेतील संघर्ष झपाट्याने विस्तारत असून, इराण-इस्रायल तणावाने आता संपूर्ण आखाताला वेढा घातला आहे. तेहरान, लेबनॉन, आखाती देश आणि हॉर्मुझ सामुद्रधुनीपर्यंत युद्धाची छाया पसरली आहे. ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले आणि क्षेपणास्त्र माऱ्यांमुळे जागतिक तेलपुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. त्याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या दरांवर दिसून येत असून जागतिक शेअर बाजारात घसरण नोंदवली गेली आहे. संघर्ष थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर हालचाली सुरू असल्या तरी रणांगणावरील कारवाया अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. यातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी दुबईत अडकलेले १६४ महाराष्ट्रवासी मायदेशात परत आले. यानंतर अर्थसंकल्पी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडून काय प्रयत्न केले जात आहेत, याची सविस्तर माहिती दिली.
हेल्पलाइनच्या माध्यमातून जी मदत शक्य आहे, ती सुरू
मूळामध्ये आपल्याला माहिती आहे की, एअर इंडियाची विमाने हळूहळू त्या ठिकाणी जाऊन लोकांना परत आणत आहेत. काही एअर स्पेसेस बंद आहेत, काही सुरू आहेत. जिथून आणणे शक्य आहे, तिथून आपण लोकांना आणत आहोत. कुवैतमध्ये समस्या आली होती. काही जणांना व्हिसाच्या अडचणी होत्या. दूतावासाने प्रयत्न करून त्यांना एका ठिकाणी थांबवलेले आहे. त्यांना अडचण येणार नाही, असा प्रयत्न आपल्यावतीने करण्यात आला. हेल्पलाइनच्या माध्यमातून जी मदत करणे शक्य आहे, ती करत आहोत. मिहिर कोटेचा यांनी दुबईत अडकलेल्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे. पाच-दहा वर्षांतील अनुभव बघितला तर पर्यटक असो किंवा विद्यार्थी असो, केंद्र सरकार संवेदनशील आहे. विपरित परिस्थितीचा सामना करत लोकांना परत आणले आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.
परदेशातील मराठी मंडळे सक्रीय करण्यात आली आहेत
परदेशात जिथे-जिथे आपली मराठी मंडळे आहेत, ती सक्रीय करण्यात आली आहेत. त्यांच्या माध्यमातून आपले जे लोक आहेत, त्यांना मदत करत आहोत. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून गिरीश महाजन त्यांच्याशी बोलले आहेत. आपले चीफ प्रोटोकॉल अधिकारी गावंडे यांना ही जबाबदारी दिली आहे. कारण ते फॉरेन सेवेचे अधिकारी आहेत. दूतावासाची एक बैठक घेण्यात आली आहे. ज्या एसओपी आहेत, त्या नागरिकांना दिल्या आहेत, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
दरम्यान, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीने व्यवस्था केली आणि लोकांना परत आणले, हा उपक्रम स्तुत्य आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारशी चर्चा करून भूमिका मांडली होती की, जे काही महाराष्ट्रातील लोक आहेत, त्यांना परत आणण्यासाठी व्यवस्था करू इच्छितो. परंतु केंद्राने सांगितले की, सगळ्याच राज्यांनी अशा प्रकारची भूमिका घेतली, तर गोंधळ होईल. एअरस्पेस सुरक्षित नाही. असुरक्षित एअरस्पेसमध्ये एखादे विमान गेले तर काय होऊ शकतो हे आपण समजू शकतो. केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. आम्हाला लोकांचे मेसेजेस येतात. आम्ही MEA ला कळवतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.