PM मोदींनी केले महाराष्ट्र सरकारचे कौतुक; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 12:49 IST2025-01-03T12:47:00+5:302025-01-03T12:49:51+5:30

CM Devendra Fadnavis News: आदिवासी बांधवांचे जल, जमीन आणि जंगल हे हक्क अबाधित ठेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

cm devendra fadnavis first reaction over pm narendra modi praised the maharashtra government | PM मोदींनी केले महाराष्ट्र सरकारचे कौतुक; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

PM मोदींनी केले महाराष्ट्र सरकारचे कौतुक; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

CM Devendra Fadnavis News: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावेळी चांगलेच मानापमान नाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले. मानापमान नाट्याचा पुढचा अंक पालकमंत्रीपदावरून दिसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद हवे असल्याबाबत इच्छा बोलून दाखवली होती. परंतु, तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली येथे जाऊन काही प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण केले. 

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीला गेले. या दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इनाम असणाऱ्या ११ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. लोकशाही मुल्यांवरील विश्वास दृढ व्हावा म्हणून आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांना संविधानाची प्रत भेट देण्यात आली. त्याचप्रमाणे पुनर्वसनासाठी राज्य सरकारकडून मदत स्वरुपात रक्कमही देण्यात आली. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

नेमके काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

दुर्गम आणि माओवादग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. यामुळे जीवन सुलभतेला निश्चितच  चालना मिळेल आणि आणखी प्रगती साधण्याचा मार्ग प्रशस्त होईल. गडचिरोली आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशातील माझ्या बंधू भगिनींचे विशेष अभिनंदन!, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली?

आमच्याकरिता हे एक प्रकारे फार मोठे कौतुक आहे. कारण गडचिरोलीचे आम्ही जे काही परिवर्तन करत आहोत, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मदत आम्हाला मिळत आहे. केंद्र सरकारसह केंद्रीय दलांची मदत मिळत आहे. त्यासह आपले जिल्हा प्रशासन आणि आपली सी६० यांच्या समन्वयामुळेच हे परिवर्तन होत आहे. जे परिवर्तन लोकांनी पाहिले याचे कौतुक पंतप्रधान मोदी यांनी केले, खरेतर याचे सगळे श्रेय पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांना देतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अढळ पाठिंबा आणि दूरदर्शी मार्गदर्शन आम्हाला गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासी भागांच्या विकासासाठी अथक परिश्रम करण्याची प्रेरणा देते. आपल्या नेतृत्वात गडचिरोली नक्षलमुक्त करून आदिवासी बांधवांचे जल, जमीन आणि जंगल हे हक्क अबाधित ठेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
 

Web Title: cm devendra fadnavis first reaction over pm narendra modi praised the maharashtra government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.