“बाळासाहेबांच्या विचारांवर ठाकरे गट आजही चालत असेल, तर वक्फ विधेयकाला विरोध करणार नाही”: CM
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 17:58 IST2025-04-02T17:53:00+5:302025-04-02T17:58:01+5:30
CM Devendra Fadnavis PC News: वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर झाल्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर निशाणा साधला.

“बाळासाहेबांच्या विचारांवर ठाकरे गट आजही चालत असेल, तर वक्फ विधेयकाला विरोध करणार नाही”: CM
CM Devendra Fadnavis PC News: प्रचंड गदारोळात वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर झाले. अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक मांडले. तसेच, हे विधेयक आणणे अत्यंत आवश्यक होते. हे विधेयक आणण्याची आवश्यकता का भासली? हेही त्यांनी सांगितले. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. संसदेतही इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी या विधेयकाला विरोध केला असून, सभागृहात बोलताना विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सत्ताधारी एनडीए सरकारवर जोरदार टीका केली. यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधेयकासंदर्भात प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा ठाकरे गटावर निशाणा साधला.
CAA, तीन तलाक, UCC अन् आता वक्फ...तीव्र विरोधातही मोदी सरकार आपल्या निर्णयावर ठाम
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभेमध्ये वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडण्यात आले आहे. मला याचा आनंद आहे की, विधेयकावर चर्चा सुरू आहे. हे विधेयक मंजूर होईल, याचा मला विश्वास आहे. आधीच्या कायद्यात न्यायालयात जाण्याची मुभा नव्हती, आता चुका सुधारण्याची संधी देण्यात आली आहे. न्यायालयात जाता येणार आहे. तीन तलाकनंतर वक्फ बोर्डात महिलांना प्रतिनिधित्व मिळाले आहे. हे विधेयक कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही, धार्मिक आस्थाच्या विरोधात नाही. पूर्वी झालेल्या चुकांमुळे काही लोक त्याचा फायदा घेत होते. मोठ्या प्रमाणांमध्ये जमिनी लाटत होते. त्यांच्यावर मात्र टाच येणार आहे, म्हणून या विधेयकाचे स्वागत करत आहे. ज्यांची विवेकबुद्धी जागृत आहे ते सगळे या विधेयकाचे समर्थन करतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. यावेळेस ठाकरे गटाच्या भूमिकेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.
'आज जर आपण गप्प बसलो, तर उद्या...'; निलेश लंकेंचा वक्फ विधेयकावर बोलताना इशारा
बाळासाहेबांच्या विचारांवर ठाकरे गट आजही चालत असेल, तर विधेयकाला विरोध करणार नाही
मी आधीही सांगितलेले आहे की, ज्यांची ज्यांची सद्सद्विवेकबुद्धी जिवंत असेल, ते या विधेयकाला पाठिंबा देतील आणि विशेषतः ठाकरे गटाच्या संदर्भात बोलायचे झाले तर, जर हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर अजूनही चालण्याची त्यांची इच्छा असेल, तर मला अपेक्षा आहे की, ते या विधेयकाला समर्थन देतील, या विधेयकाचा विरोध करणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच संजय राऊत यांनी वक्फ सुधारणा विधेयकावर भाष्य करताना टीका केली होती. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता, कोण संजय राऊत? मी तुम्हाला दहावेळा सांगितले आहे की, माझ्या लेव्हलचे प्रश्न विचारत जा, नाहीतर मला तुमच्या बुद्धीची कीव करावी लागेल, असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
दरम्यान, विरोधक या संदर्भात कोणताही पुरावा आणू शकले नाहीत. २५ राज्यांनी ज्या सुधारणा सांगितल्या त्या करण्यात आल्या आहेत. मला असे वाटते की, विरोधकांनी जर छातीवर हात ठेऊन जर निर्णय केला तर या विधेयकाच्या बाजूनेच निर्णय करतील. त्यांची लाचारी आहे. म्हणून आता विरोधक या सुधारणा विधेयकाचा विरोध करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.