“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 06:19 IST2025-10-25T06:17:23+5:302025-10-25T06:19:00+5:30
राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ सुरू केले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ सुरू केले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी राजभवन येथे राज्यातील मंत्री, आमदार आणि खासदारांसाठी ‘नैसर्गिक शेती’ विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यपालांच्या नेतृत्वाखाली राज्यात प्राकृतिक शेती मिशन सुरू करत आहोत. ज्यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल, उत्पादकता वाढेल, जमिनीची क्षमता आणि कस वाढेल, त्यातून शेती फायद्याची होईल. वातावरण बदलावरही हा रामबाण उपाय आहे.
रासायनिक शेतीमुळे जमीन वाळवंट होत आहे. जमीन, पाणी व हवा प्रदूषित होत आहे. अन्नधान्य विषयुक्त होत आहे. भावी पिढी आरोग्यवान व्हावी याकरिता नैसर्गिक शेती अनिवार्य आहे, असे ज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सांगितले.
हमीभाव केंद्रावरच जा...
राज्यात यंदा कापूस आणि सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला कापूस आणि सोयाबीन खरेदीसाठी राज्य सरकार राज्यभर खरेदी केंद्रे सुरू करणार असून, शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्रावरच आपला माल विकावा. खाजगी व्यापारी त्यांचा माल हमीभावाने विकत घेत असेल तरच तो खाजगी व्यापाऱ्यांना विकावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.