आमदारांनी साेडली ‘पायरी’! शिंदे गट आणि राष्ट्रवादी आमदार भिडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 06:11 IST2022-08-25T06:09:42+5:302022-08-25T06:11:24+5:30
विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडले आणि बघता, बघता आमदारांनी ‘पायरी’ सोडली.

विधानभवनाच्या पायऱ्यांनी आज न भुतो असा प्रसंग पाहिला. धोषणाबाजीने सुरू झालेले युद्ध हाणामारी आणि शिवीगाळ करण्यापर्यंत उतरले. एकमेकांची कॉलर पकडण्यासही आमदारांनी मागेपुढे पाहिले नाही. राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांच्यातील राडा सोडवण्याचा प्रयत्न केला, पण या प्रयत्नात त्यांचीही कॉलर कुणीतरी पकडली. (छाया: दत्ता खेडेकर)
मुंबई :
विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडले आणि बघता, बघता आमदारांनी ‘पायरी’ सोडली. शिवीगाळ, धक्काबुक्की आणि चौकातील गावगुंडाच्या भांडणासारखी आमदार मंडळी एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा लाजिरवाणी आणि धक्कादायक प्रकार बुधवारी घडला. विधानभवन ही पवित्र वास्तू असल्याचा उल्लेख सर्वच पक्षाचे आमदार करत असतात. मात्र, त्याच पवित्र वास्तूच्या पायऱ्यांवर हा अभूतपूर्व प्रसंग घडल्याने सर्वजण अवाक झाले. आता दोन्ही बाजूच्या आमदारांना समज देण्यात येणार आहे.
आम्हीच धक्काबुक्की केली
मागील तीन दिवस आम्हाला गद्दार बोलत होते, त्यामुळे वस्तुस्थिती सांगण्यासाठी आम्ही घोषणाबाजी केली. आम्ही त्यांचा इतिहास बाहेर काढला म्हणून मिरची झोंबली. आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, अशी प्रतिक्रिया याप्रकरणाचे समर्थन करताना शिंदे गटाचे भरत गोगवले यांनी दिली. आम्हीच धक्काबुक्की केली, आम्ही घाबरणारे नाही, असा दावाही गोगावले यांनी केला. महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, तर मिटकरींनी धमकावल्याचा दावा सत्ताधारी आमदारांनी केला आहे.
एकनाथ शिंदे - पवार चर्चा
आमदारांच्या या राड्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात चर्चा झाली. आपल्या गटातील आमदारांना समज दिली जाईल, असे शिंदेंनी अजित पवारांना या बैठकीत सांगितल्याचे समजते.
कसा झाला गोंधळ?
सुरूवात...
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विधानभवनाच्या पायऱ्यांवर ‘५० खोके एकदम ओक्के’ अशा घोषणा देत आंदोलन करणाऱ्या विरोधकांना उत्तर देण्यासाठी सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांनी सकाळी लवकर आंदोलनाला सुरुवात केली.
1. पहिली ठिणगी
सत्ताधारी पक्षाचे हे आंदोलन सुरू असतानाच विरोधक महाविकास आघाडीचे आमदार आंदोलनासाठी पायऱ्यांवर आले. एकाच वेळी सत्ताधारी आणि विरोधक आमदार पायऱ्यांवर येऊन एकमेकांविरोधात जोरदार घोषणा देऊ लागले. या घोषणांचे पर्यवसान पुढे एकमेकांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यापर्यंत गेले. यात शिंदे गटाचे आमदार आणि राष्ट्रवादीचे आमदार एकमेकांना भिडल्याचे अभूतपूर्व चित्र विधानभवनात पाहायला मिळाले.
एकमेकांवर घोषणांतून हल्ले
2. शिंदे गट आणि भाजप
आमदारांनी आंदोलन करताना ‘मातोश्री’ आणि ‘सिल्व्हर ओक’विरोधात घोषणाबाजी सुरू केली. अनिल ‘देशमुखांचे खोके मातोश्री ओक्के’, ‘अनिल देशमुखांचे खोके सिल्व्हर ओक ओक्के’, ‘सचिन वाझेचे खोके मातोश्री ओक्के’, ‘लवासाचे खोके सिल्व्हर ओक ओक्के’ अशा घोषणा हे आमदार देत होते. शिंदे गटातील भरत गोगावले, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, महेश शिंदे, मंगेश कुडाळकर, चिंतामण वनगा हे आमदार ‘मातोश्री’विरोधात घोषणाबाजी करत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही त्या ठिकाणी आले. त्यांनी पायऱ्यांवर आणि सभागृहातही आक्रमक व्हा, अशा सूचना आपल्या आमदारांना दिल्या. ही घोषणाबाजी सुरू असतानाच आदित्य ठाकरेंचे विधानभवनात आगमन झाले. आदित्य ठाकरेंसमोर शिंदे गटातील आमदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ‘अनिल परबचे खोके, मातोश्री ओक्के’, ‘स्टँडिंगचे खोके मातोश्री ओक्के’च्या घोषणा द्यायला सुरुवात केली.
3. राष्ट्रवादीचा प्रतिहल्ला
राष्ट्रवादीचे आमदार ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’ अशा घोषणा देत पायऱ्यांवर आले आणि त्यानंतर एकच गोंधळ सुरू झाला. राष्ट्रवादीचे अंमळनेरचे आमदार अनिल पाटील हातात गाजर घेऊन पायऱ्यांवर आले.
4. ...आणि धक्काबुक्की
हे घोषणायुद्ध सुरू असताना राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे महेश शिंदे यांच्यात धक्काबुक्की झाली. शिंदे गटाचे भरत गोगवले, दिलीप लांडेही या धक्काबुक्कीत सहभागी झाले. अमोल मिटकरी आणि संजय शिरसाट यांच्यातही यावेळी जुंपल्याचे पाहायला मिळाले. त्याचवेळी राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. इथे असलेल्या सुरक्षा रक्षकांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये साखळी करून दोन्ही गटांना वेगळे केले.