शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 05:22 IST2025-07-03T05:21:48+5:302025-07-03T05:22:27+5:30
संतप्त विराेधी पक्षांचा सभात्याग, ३ महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी सलग दुसऱ्या दिवशी विधानसभेत सरकारला धारेवर धरले. तीन महिन्यांत राज्यात ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बैल नाही म्हणून शेतकऱ्याला स्वत:ला जोताला जुंपून घ्यायची वेळ आली आहे. कर्जमाफी देऊ म्हणून सत्तेत आलेले सरकार आता हे आश्वासन विसरले, असा हल्लाबोल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
"दहशतवादी हल्ला झाला, तर आम्ही जशास तसे उत्तर देणार"; जयशंकर यांनी अमेरिकेतून पाकिस्तानला फटकारलं
आम्ही स्थगनप्रस्ताव दिला आहे, तेव्हा आताच चर्चा करा, असा आग्रह विरोधकांनी धरला. त्यावर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांनी प्रस्ताव आणावा, मी चर्चेला पूर्ण दिवस द्यायला तयार आहे, असे सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, तत्काळ चर्चेची मागणी मान्य न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला.
सरकार चर्चेसाठी तयार : उपमुख्यमंत्री
शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडवणे, शेतकऱ्यांना मदत करणे, ही सरकारची जबाबदारी असून आमचे सरकार ती पार पाडेलच. मात्र, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आडून राजकारण करू नये, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट मांडली.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, कृषिमंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात, माजी मंत्री बबनराव लोणीकर शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह विधान करतात. शेतमालाला हमीभाव मिळत नाही. निवडणुकीआधी कर्जमाफी करू, अशी घोषणा केली होती. आता मात्र सरकार समितीला पुढे करत आहे.
माझी हाडेही म्हणतील मी शेतकऱ्यांसोबत
२५ वर्षे शेतकरी मला निवडून देत आहेत. शेतकऱ्यांसाठी मी मोर्चे काढले, आंदोलने केली. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, मी शेतकऱ्यांच्या विरोधात बोललो नाही काही लोक राजकारण करत आहेत. माझ्या मृत्यूनंतरही माझी हाडेसुद्धा म्हणतील मी शेतकरी आहे.
बबनराव लोणीकर, आमदार, भाजप