चौपाटी, छावा सिनेमा, वॉटर किंग्डम सैर; बेपत्ता मुलींचा ८ तासांत शोध, पोलिसांची वणवण, पालकांना घोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 11:16 IST2025-03-07T11:15:15+5:302025-03-07T11:16:37+5:30
घरातून बेपत्ता झालेल्या १२ वर्षांच्या दोन मुलींचा निर्मलनगर पोलिसांनी अवघ्या आठ तासांत शोध घेत त्यांना सुखरूपपणे पालकांच्या ताब्यात दिले.

चौपाटी, छावा सिनेमा, वॉटर किंग्डम सैर; बेपत्ता मुलींचा ८ तासांत शोध, पोलिसांची वणवण, पालकांना घोर
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वांद्रे पूर्व राहणाऱ्या घरातून बेपत्ता झालेल्या १२ वर्षांच्या दोन मुलींचा निर्मलनगर पोलिसांनी अवघ्या आठ तासांत शोध घेत त्यांना सुखरूपपणे पालकांच्या ताब्यात दिले. त्यामुळे त्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
५ मार्चला हा प्रकार घडला. या दोन्ही मुली जुहू चौपाटीला गेल्याचे एकीच्या बहिणीने पालकांना सांगितले. त्यानुसार त्यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज पडताळण्यात आले. सुरुवातीला एका मुलीची आई-वडिलांपासून विभक्त होत बदलापूरला राहत असल्याने त्या तिच्याकडे गेल्या असतील, अशी शंका पोलिसांना आली.
रात्री पार्कमध्ये केला मुक्काम
त्या मुलीच्च्या आईकडे चौकशी केल्यावर त्या तिच्याकडे आल्या नसल्याचे समजले. त्यानुसार मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क करत सर्व पोलिस ठाण्यांना याबाबत अलर्ट करण्यात आले. तसेच विविध व्हॉट्सअॅप ग्रुपवरही याबाबतची माहिती व्हायरल करण्यात आली.
या दोघी बोरीवली रेल्वे स्टेशनजवळील अजंता थिएटरमध्ये रात्री १० वाजता 'छावा' चित्रपट पाहून तिथून जवळ असलेल्या ब्रह्मकुमारी पार्कमध्ये उत्तर रात्री १:१५ च्या दरम्यान गेल्या. त्या रात्रभर तिथेच थांबल्या. तसेच तिथून सकाळी ८ वाजता त्या एका रिक्षाने गोराई जेट्टी परिसरात उतरल्याचे संबंधित रिक्षाचालकाने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी या दोघी 'एस्सेल वर्ल्ड' अथवा 'वॉटर किंग्डम'मध्ये असल्याची शक्यता व्यक्त केली. इंटरनेटच्या मदतीने 'वॉटर किंग्डम' व्यवस्थापनाला माहिती देत त्यांच्या मदतीने या दोन्ही मुलींना ताब्यात घेत पालकांच्या ताब्यात दिले.