ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 06:34 IST2025-10-31T06:33:51+5:302025-10-31T06:34:35+5:30
ओलिस ठेवल्याची चाहुल लागताच त्यातील एका महिलेने काच फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न

ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
मुंबई : ऑडिशनसाठी सोशल मीडियावर जाहिरात देत ग्रामीण भागातील मुलांना टार्गेट करण्यात आले होते. गुरुवारी ठरल्याप्रमाणे जवळपास १०० हून अधिक मुलांपैकी १७ मुलांची निवड करत त्यांना ओलिस धरून मागण्या करण्यात आल्या, आपल्याला ओलिस ठेवल्याची चाहुल लागताच त्यातील एका महिलेने काच फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नागरिकांना इशारा केल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.
रोहित आर्याने गेल्या काही दिवसांपासून ऑडिशन घेणे सुरू केले होते. त्याने महावीर क्लासिक इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील आर. ए. स्टुडिओ भाड्याने घेतला. सातारा, सांगली, परभणी, लातूरसारख्या भागांतून मुले अभिनयात करिअर करायला मिळेल, अशी स्वप्ने घेऊन पालकांसोबत मुंबईत आली. गुरुवारीदेखील जवळपास १००हून अधिक मुले ऑडिशनसाठी आली. त्यातील १७ जणांची निवड करण्यात आली. इतरांना बाहेर काढल्यानंतर रोहितने हॉल बंद केला. त्यानंतर त्याचा व्हिडीओ व्हायरल केला. यातील एका महिलेने काच तोडून बाहेरच्या लोकांकडे मदत मागण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये ती किरकोळ जखमी झाली आहे. हा प्रकार समजताच खाली थांबलेल्या पालकांमध्ये गोंधळ उडाला. तणावाचे वातावरण निर्माण झाले. दीडच्या सुमारास घटनेची वर्दी मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने मुलांची सुटका केली.
मुलांना खूश करण्यासाठी मागवले पिझ्झा आणि कोल्ड्रिंक
शाळेमधून मुलांना ऑडिशन देण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आली होती. कोल्हापूरमधून सुद्धा मुलं ऑडिशन देण्यासाठी आली होती. या सर्व मुलांची रोहित आर्याने सकाळी ऑडिशन घेतली. यानंतर लहान मुलांना खुश करण्यासाठी रोहित आर्याने पिझ्झा आणि कोल्ड्रिकसोबत इतर खाण्याच्या वस्तू मागवल्या. ऑडिशन झाल्यानंतर त्याने सर्व मुलांना बंधक बनवण्यास सुरुवात केली. लहान मुलांच्या डोक्यावर बंदूक ठेवून कोणी बोलू नका, नाही तर गोळी मारेन अशी धमकी आरोपी रोहित आर्या देत राहिला. छन्ऱ्याच्या बंदुकीने लहान मुलांना बंदी बनवणाऱ्या रोहित आर्या मुलांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. मात्र, पवई पोलिसांनी वेळीच हालचाल केल्याने मोठा अनर्थ टाळला. सध्या शाळेला दिवाळीच्या सुट्टया असल्याने पालक आपल्या मुलांना वेगवेगळ्या कोर्सेसला किंवा इतर ऑक्टव्हीटीसाठी गुंतवून ठेवत आहेत. त्यातच, मुंबईच्या पवई येथील आरए स्टुडिओत काही शाळकरी मुले गेल्या चार-पाच दिवसांपासून प्रशिक्षणसाठी येत होती.
एक ते दीड तास चर्चा
जवळपास एक ते दीड तास चर्चा करत रोहितच्या मागण्या जाणून घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र, तो नेमक्या मागण्या सांगत नव्हता. सुरुवातीला त्याने माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलायची मागणी केली. त्यानंतर कॉल जोडण्याचा प्रयत्न करताच पुन्हा विषय टाळला. त्यानंतर एक ते दीड तास चर्चा करूनही मार्ग न निघाल्याने पोलिसांनी आत प्रवेश केला. यादरम्यान रोहितने एअर गनने गोळी झाडताच पोलिसांनी त्याच्या दिशेने गोळी झाडली. छातीला डाव्या बाजूला गोळी लागताच तो खाली कोसळला. त्यानंतर पोलिसांनी मुलांची सुखरूप सुटका करत निश्वास सोडला.
... म्हणून आला संशय
सकाळी दहा ते आठ असे ऑडिशन चालायचे आणि दुपारी दोन वाजता रोहित त्यांना जेवायला पाठवायचा; पण आज काही मुले जेवायला आली नसल्याने पालकांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क न झाल्याने तणाव वाढला.
'अ थर्सडे' चित्रपटाची तंतोतंत पुनरावृत्ती
'अ थर्सडे' या थ्रिलर हिंदी चित्रपटात मुंबईतील एक प्ले स्कूलची शिक्षिका नैना जायसवाल (यामी गौतम) ही तिच्या शाळेतल्या १६ लहान मुलांना ओलिस धरते आणि पोलिसांना फोन करून काही अवास्तव मागण्या करते. सुरुवातीला ती हा गुन्हा का आणि कोणासाठी करत आहे, हे कोडे पोलिसांना समजत नाही. मात्र, जसजसा घटनाक्रम पुढे सरकतो, तसतसे नैनाचे हेतू स्पष्ट होत जातात. ती केवळ दहशत निर्माण करण्यासाठी नव्हे, तर समाजातील महिलांवरील अत्याचार आणि न्यायव्यवस्थेतील त्रुटींविरोधात आवाज उठवण्यासाठी हा मार्ग निवडते. या चित्रपटासारखेच नाटव पवईतील ओलिस ठेवण्याच्या घटनेतून दिसून आली.
मी आत्महत्या करण्याऐवजी ही योजना आखली... मला फक्त बोलायचे आहे...
मी रोहित आर्या आत्महत्या करण्याऐवजी मी एक प्लॅन केला असून काही मुलांना होस्टेज बनवले आहे. माझ्या जास्त मागण्या नाहीत. माझे काही प्रश्न आहे. मला काही जणांशी बोलायचे आहे. काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. मी दहशतवादी नाही. ना माझी काही पैशांची मागणी आहे. मला फक्त बोलायचे आहे त्यासाठी मी या मुलांना ओलिस ठेवले. मी जिवंत राहिलो किंवा नाही राहिलो तरी ही योजना मार्गी लागेल. मी एकटा नाही आहे. मी एक सामान्य नागरिक आहे. मला फक्त बोलायचे आहे. अन्यथा मी या संपूर्ण जागेला आग लावणार आहे. यामध्ये मला काही झाले तर फरक पडणार नाही. पण विनाकारण मुलांना याचा त्रास होईल. याला फक्त संबंधित व्यक्तींना जबाबदार धरावे. माझे बोलणे झाल्यानंतर मी स्वता बाहेर येणार आहे. मी फक्त बोलून त्यातून मार्ग काढणार आहे. कृपया मला विनाकारण डिवचू नका.
स्टुडिओच्या मागील बाथरूममार्गे आत शिरले पोलिस...
सकाळी १० वा. : ऑडिशनच्या सहाव्या दिवशी नेहमीप्रमाणे १०० मुले महावीर क्लासिक इमारतीच्या आरए स्टुडिओमध्ये आली. ज्यात ज्येष्ठ नागरिक कानसह तिघांचा समावेश. त्यांच्यासह १७ मुलांची निवड करत त्यांना रोहित आर्याने ओलिस ठेवले.
दुपारी १.३० वा. : पोलिसांना अनोळखी व्यक्तीने फोन करून महावीर क्लासिक इमारतीमध्ये काहींना ओलिस ठेवण्यात आल्याची माहिती दिली.
दुपारी १.५० वा. : पवई पोलिस ठाण्याचे अधिकारी, क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी), बॉम्ब शोधक आणि निकामी करणारे पथक घटनास्थळी पोहचले.
दुपारी २ वा.: पोलिसांची जवळपास तासभर आर्यशी चर्चा केली. मात्र ती निष्फळ ठरली.
दुपारी ३.२५ वा.: अग्निशमन दलाला माहिती मिळताच पथक घटनास्थळी दाखल झाले.
दुपारी ३.३० वा. : पोलिसांनी स्टुडिओच्या मागील बाथरूममार्गे आत शिरून, हायड्रॉलिक टूल्सच्या मदतीने लोखंडी ग्रील्स कापून प्रवेशद्वार उघडले. रोहितने पोलिसांवर एअरगन ताणली. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. ती गोळी त्याच्या डाव्या छातीवर लागली. जखमी अवस्थेत त्याला बाहेर काढत ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दुपारी ४.१५ वा.: सर्व ओलिसांची सुटका करत त्यांना एका बसने वैद्यकीय उपचार आणि काउन्सिलिंगसाठी पाठवण्यात आले.
दुपारी ५.१५ वा. : रोहितचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला
अन् अमोल वाघमारेने केला एन्काउंटर
रोहित आर्या ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने बाथरूमच्या मार्गान पवई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे आणि एक पोलीस अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने लोखंडी ग्रील कापून आत शिरले. कोणीतरी आतमध्ये आल्याची चाहूल लागताच रोहित त्यांच्या दिशेने धावला. त्याने पोलिसांसमोर एयरगन ताणताच अमोल वाघमारेने त्याच्या दिशेने गोळी झाडली.