Join us

बाल दिन विशेष : जगातील १.२ अब्ज मुलांचे आयुष्य धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 02:17 IST

गरीबी, लिंगभेद ही प्रमुख कारणे : जागतिक आकडेवारीत भारत ११३व्या क्रमांकावर

सीमा महांगडे

मुंबई : मुले म्हणजे देवाघरची फुले. मात्र, या कोवळ्या फुलांचेच बालपण हरवत असल्याचे एका अहवालातील आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. ‘सेव्ह द चिल्ड्रेन’ या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालात गरिबी आणि लिंगभेद ही मुलांचे बालपण हरवण्याची मुख्य कारणे आहेत.१७५ देशांच्या आकडेवारीनुसार, सिंगापूर आणि स्लोव्हेनिया देशांचा अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक लागतो, म्हणजेच तेथील मुले ही तुलनेने चांगल्या परिस्थितीत आहेत. नायजर, माली आणि मध्य आफ्रिकन रिपब्लिकमधली मुले धोक्यात आहेत. प्रगत देशांपैकी अमेरिका ३६व्या क्रमांकावर, रशिया ३७व्या आणि चीन ४७व्या क्रमांकावर आहे. ज्या देशातील मुलांचे बालपण हरवत आहे, त्यामध्ये भारताचा ११३वा क्रमांक लागतो.

‘सेव्ह द चिल्ड्रेन’ या संस्थेच्या एन्ड आॅफ चिल्ड्रेन इंडेक्सनुसार जगातल्या सुमारे १.२ अब्ज मुलांचे आयुष्य धोक्यात आहे. भारताचा यात ११३वा क्रमांक लागत असून, गरिबी आणि लिंगभेद ही बालपण हरवत असल्याची प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे. मुलांची हत्या, कुपोषण, शिक्षणाचा अभाव, बालविवाह, कुमारीमाता, बाल कामगार यावरून एन्ड आॅफ चिल्ड्रेन इंडेक्स ठरविला जातो.ज्या १. २ अब्ज मुलांचे बालपण हरवत आहे, त्यापैकी १ अब्ज मुले ही गरिबीने ग्रासलेल्या देशांत राहतात, तर २४ कोटी मुले ज्या देशांत युद्धजन्य परिस्थिती आहे, अशा देशांत राहतात. एन्ड आॅफ चिल्ड्रेन इंडेक्सनुसार, ५७. ५ कोटी मुले ही ज्या देशांत लिंगभेद अजूनही केला जातो, अशा देशांत राहत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुले कुठल्या वातावरणात जन्माला आली आहेत? तेथील परिस्थिती काय आहे ? त्याचे लिंग कोणते? यावरून बालपणावर आणि भविष्यावर गदा येत आहे, अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे.२०१८च्या कम्प्लिट एन्ड आॅफ चाइल्डहूड इंडेक्सनुसार, १७५ देशांच्या यादीत भारत १००० गुणांमागे ७६८ गुणांसह ८व्या क्रमांकावर आहे. २०१२ ते २०१७च्या दरम्यान प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे भारतातील एकूण प्रमाण २०.२ % होते, तर २०१२ ते २०१७च्या दरम्यान ५ वर्षांपर्यंतच्या कुपोषित मुलांचे प्रमाण ३८.४ % होते, जे इतर देशांच्या तुलनेत अधिक असल्याचे म्हटले आहे.या अहवालानुसार, जगातल्या मुलांची परिस्थिती सुधारण्यासाठी काही ठरावीक समस्यांवर एकजुटीने मात करावी लागणार आहे, ज्यामध्ये बालविवाह, कुमारी मातृत्व, गरीब आणि श्रीमंत देशातली वाढती दरी, बालमृत्युदर, बाल कामगार, शिक्षणाचा अभाव या समस्यांचा समावेश होतो.आरे कॉलनीत प्लॅस्टिक चेंडूचे मोझेक पोट्रेटच्गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतील युनिट क्रमांक २६ येथील मरोशी पाड्यात १४ नोव्हेंबर या बाल दिनाचे औचित्य साधून मंगळवारी प्लॅस्टिकच्या चेंडूपासून मोझेक पोट्रेट तयार करण्यात आले. जागतिक विक्रमवीर चेतन राऊत यांनी आदिवासी पाड्यातील शेकडो लहान आदिवासी समाजातील मुलांना महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या वारली कलेचे प्रात्यक्षिक व उपहार देऊन बाल दिन साजरा केला. तसेच बाल दिनानिमित्त मुलींनी आपल्या घरावर वारली चित्रेदेखील काढली. चेतन यांनी प्लॅस्टिकच्या छोट्या चेंडूंपासून बनविलेल्या मोझेक पोट्रेटमध्ये ६ हजार चेंडूंचा वापर केला. ८ फूट रुंद व ८ फूट लांब पोट्रेट तयार करण्यात आले. या पोट्रेटची नोंद इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड व युनिक बुक आॅफ रेकॉर्ड यांनी नुकतीच घेतली. आदिवासी समाजातील मुले अनेक सोयी-सुविधांपासून वंचित असतात. त्यामुळे हा विश्वविक्रम त्यांच्या सोबत साजरा करण्याचे ठरविले. मी स्वत: आदिवासी समाजाचा असून देशासाठी ५ विश्वविक्रम केले आहेत. माझ्यासारखेच या मुलांनीदेखील मोठे होऊन खूप पुढे जावे, असे मत चेतन राऊत यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :बालदिनआरोग्यभारत