धक्कादायक! लहान मुलाला ६८ वर्षीय व्यक्तीकडून मारहाण, पोलिसांकडून तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 14:33 IST2023-12-04T14:32:52+5:302023-12-04T14:33:37+5:30
बोरीवलीत ८ वर्षाच्या लहान मुलासोबत धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी उघड केली आहे.

धक्कादायक! लहान मुलाला ६८ वर्षीय व्यक्तीकडून मारहाण, पोलिसांकडून तपास सुरू
Crime News: गेल्या काही दिवसांपूर्वी बोरिवली पोलिसांनी प्ले झोनमध्ये चार वर्षांच्या चिमुरडीला कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ही घटना ताजी असतानाच आता बोरीवलीमध्ये एका ८ वर्षाच्या मुलासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. बोरिवली पोलिसांनी ६८ वर्षीय व्यक्तीविरोधात मुलाला मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला. ११ नोव्हेंबरला ही घटना घडल्याचे सांगण्यात येते.
आपल्या घराबाहेर खेळत असताना एका अज्ञात व्यक्तीने लहान मुलाला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर त्या मुलाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे असून तो मुलगा घराबाहेर पडण्यासाठी घाबरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. इयत्ता तिसरीचा विद्यार्थी असलेला हा मुलगा आपल्या पालकांसोबत बोरिवली पश्चिम येथे राहतो. आरोपी देखील त्याच हाउसिंग सोसायटीतील आहे.
आरोपी पीडित मुलांसोबत गैरवर्तन तसेच, त्याला शाब्दिक शिवीगाळ करत असल्याचे समोर आले. या प्रकरणामुळे सोसायटातील लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत मुलाच्या पालकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. बोरिवली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. परंतु अद्यापही तो लहान मुलगा घटनेतून सावरला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आठ वर्षांचा मुलगा हाऊसिंग सोसायटीच्या आवारात मित्रांसोबत खेळत होता. इमारतीच्या आवारात खेळत असताना आरोपीला राग अनावर झाला. त्यानंतर आरोपीने मुलाला मारहाण केली. ही घटना सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्हीत घाबरलेल्या मुलाने माफी मागत स्वत:ला सोडण्याची विनवणी केली, पण आरोपी त्याच्यावर ओरडत असल्याचे दिसत आहे. या घटनेमुळे मुलावर गंभीर मानसिक परिणाम झाला आहे.