मुख्यमंत्री करणार अयोध्येत महाआरती; लखनाैत ढाेल-ताशांच्या गजरात स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 05:24 IST2023-04-09T05:24:05+5:302023-04-09T05:24:40+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नियोजित अयोध्या दौऱ्यासाठी शनिवारी विशेष विमानाने लखनौमध्ये दाखल झाले.

मुख्यमंत्री करणार अयोध्येत महाआरती; लखनाैत ढाेल-ताशांच्या गजरात स्वागत
लखनाै/मुंबई :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नियोजित अयोध्या दौऱ्यासाठी शनिवारी विशेष विमानाने लखनौमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांचे लखनाै विमानतळावर ढाेल-ताशांच्या गजरात स्वागत भव्य स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांना माेठा हार आणि गदा देण्यात आली.
रविवारी दुपारी रामलल्लाचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री तेथील महाआरतीत सहभागी होणार आहेत. तब्बल नऊ तासाच्या दौऱ्यात ते भव्य राममंदिराच्या निर्मितीचा आढावा घेणार आहेत. महाआरतीनंतर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतील. दौऱ्यासाठी शिवसैनिक विशेष गाडीने आधीच अयोध्येला पोहोचले आहेत. मंत्री, खासदार, आमदार यांच्यासाठी हॉटेल, गेस्ट हाऊस, धर्मशाळा बुक आहेत.
भाजपचे नेतेही सहभागी
- मुख्यमंत्र्यांसोबत भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन आणि आमदार संजय कुटे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.
- गिरीश महाजन, संजय कुटे, राम शिंदे हे थेट अयोध्येला पोहोचणार असून राधाकृष्ण विखे- पाटील हे उद्या लखनौहून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात सहभागी होतील.
जगत् परमहंस करणार स्वागत
- अयोध्येतील तपस्वी छावणीचे महंत जगतगुरू परमहंस आचार्य मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणार आहेत.
- काँग्रेससोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या विचारापासून दूर गेले, म्हणून महंत परमहंस यांनी उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. ‘बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम एकनाथ शिंदे करत आहेत. यामुळे साधू-संतांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे परमहंस यांनी म्हटले आहे.