मुख्यमंत्री ठाकरे अन् नारायण राणे येणार एकाच व्यासपीठावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 09:40 IST2021-09-09T07:18:23+5:302021-09-09T09:40:43+5:30

चिपी विमानतळ उद्घाटनाचा वाद शमला

Chief Minister Thackeray and Rane will come on the same platform pdc | मुख्यमंत्री ठाकरे अन् नारायण राणे येणार एकाच व्यासपीठावर

मुख्यमंत्री ठाकरे अन् नारायण राणे येणार एकाच व्यासपीठावर

ठळक मुद्देसिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबर रोजी नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होणार असून उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांना बोलावलेच पाहिजे असे काही नाही, असे विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी नवी दिल्लीत पत्र परिषदेत

मुंबई : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटन समारंभाला केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सामंजस्याची भूमिका घेतल्यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही समारंभाला मुख्यमंत्री ठाकरे व केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे उपस्थित राहणार असल्याचे बुधवारी स्पष्ट केले.

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबर रोजी नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होणार असून उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांना बोलावलेच पाहिजे असे काही नाही, असे विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी नवी दिल्लीत पत्र परिषदेत केले होते. त्यावरून राणे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय वादाला आणखी एक फोडणी मिळाली होती. फडणवीस यांनी ‘केंद्र आणि राज्य सरकारने समन्वयातून काम करायचे असते’ असे विधान करीत ठाकरे यांच्या उद्घाटन समारंभातील उपस्थितीचे एकप्रकारे समर्थनच केले. नागपुरात ते म्हणाले की, चिपी विमानतळ तयार करण्यामध्ये राणे यांचा सहभाग कुणीच नाकारू शकत नाही. मी मुख्यमंत्री असताना ते काम पूर्ण झाले. उद्घाटनही आम्ही केले होते. आता प्रत्यक्ष विमान उडणार आहे. ही श्रेयवादाची लढाई नाही. सुभाष देसाई यांनी मंत्रालयात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले, की ९ ऑक्टोबरचा समारंभ मुख्यमंत्री ठाकरे व केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. एमआयडीसीने विमानतळाचे काम पूर्ण केले आहे. दोन्ही प्रमुख अतिथींच्या स्वागतासाठी मी समारंभाला हजर राहीन.

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांचा सन्मान राखला पाहिजे. त्यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आले पाहिजे, असे मत व्यक्त केले. भले शिवसेनेच्या प्रयत्नामुळे चिपी विमानतळ झाले नसेल, भाजपच्या मुहूर्तमेढीमुळे झाले असेल तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान झाला पाहिजे, असेही शेलार म्हणाले.

ठाकरे-शिंदेंमध्ये झाली चर्चा
राणेंच्या विधानावर टीका करताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले की, चिपी विमानतळाचे श्रेय घेण्याचा राणेंना अधिकार नाही. त्यांनी उगाच फुशारक्या मारू नयेत. मुख्यमंत्री ठाकरे व मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात मंगळवारी सकाळीच चर्चा झाली. कार्यक्रम ठरला. मुख्यमंत्र्यांनी मला फोन करून ही माहिती दिल्यानंतर ९ ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली.

Web Title: Chief Minister Thackeray and Rane will come on the same platform pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.