Join us

'त्यांना स्वप्न पाहू द्या'; संजय राऊतांच्या सत्ता परिवर्तनाच्या दाव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 13:23 IST

राज्य सरकार पूर्णपणे मजबूत आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबई- शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात दिवसेंदिवस पुढे जाताना दिसेल. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरेंबद्दल द्वेष, तिरस्कार शिंदे गटातील आमदारांमध्ये दिसतोय. परंतु हा द्वेष, तिरस्कार महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या मनात नाही. भावनेच्या भरात, काहींना फसवून शिंदे गटात सामील केलं आहे. त्यातील काही आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे भविष्यात पुन्हा महाराष्ट्रात सत्ताबदल होईल, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

दुसऱ्या पक्षात जायला किती आमदार मानसिकदृष्ट्या तयार आहेत याची कल्पना आम्हाला आहे. शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन झाले तर आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. शिवसेना सर्व निवडणुका लढवणार आहे. भाजपाला शिवसेना फोडायची होती. महाराष्ट्राला दुबळं आणि मराठी माणसाला कमजोर करण्याचं कारस्थान भाजपाचं होतं. त्यात जे यश त्यांना आले हे दिर्घकाळ टिकणार नाही असंही संजय राऊत म्हणाले. 

संजय राऊतांच्या या विधानावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात १६६ आमदारांचं सरकार आहे. लोकसभेतही १२ आमदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं आहे. राज्यात आणि केंद्रातही पक्षाकडे बहुमत आहे. सरकार पूर्णपणे मजबूत आहे. त्यामुळे त्यांना स्वप्न पाहू द्या, असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

दरम्यान, सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिन्यातून ५ वेळा दिल्लीत येतायेत. त्यामुळे महाराष्ट्रात गोंधळ आहे. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना कधी दिल्लीत यावं लागलं नाही. शिवसेनेचे हायकमांड मुंबईतच, दिल्लीतील नेतेही मुंबईत येऊन चर्चा करतात. मात्र आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सातत्याने दिल्लीला जातात. पाचवेळा दिल्लीत आले. कदाचित मुख्यमंत्र्यांचा मुक्काम दिल्लीत हलवणार का? असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे.

टॅग्स :एकनाथ शिंदेसंजय राऊतशिवसेना