'लोकभावना आणि धार्मिक भावना जपण्याच्या दृष्टीने मार्ग काढणार'; दादरमधल्या राड्यानंतर CM फडणवीसांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 16:47 IST2025-08-06T16:43:15+5:302025-08-06T16:47:32+5:30

दादरच्या कबुतरखान्याजवळ झालेल्या राड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली

Chief Minister Devendra Fadnavis reacted to the clash that took place near Dadar Kabootar Khana | 'लोकभावना आणि धार्मिक भावना जपण्याच्या दृष्टीने मार्ग काढणार'; दादरमधल्या राड्यानंतर CM फडणवीसांचे आश्वासन

'लोकभावना आणि धार्मिक भावना जपण्याच्या दृष्टीने मार्ग काढणार'; दादरमधल्या राड्यानंतर CM फडणवीसांचे आश्वासन

CM Devendra Fadnavis on Dadar Kabootar Khana: मुंबईती कबुरतखान्यांचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून पेटला आहे. राज्य सरकारच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दादरसह अनेक कबुतरखान्यांवर कारवाई केली. मात्र यामुळे कबुतर प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. बुधवारी संताप अनावर झाल्याने कबुतर प्रेमींनी महापालिकेने झाकून ठेवलेला कबुतरखाना पुन्हा सुरु केला. यामुळे मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. या सगळ्या राड्यानंतर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. धार्मिक भावना आणि लोकांचे आरोग्य यांची सांगड घालणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई हायकोर्टाने मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. यासंदर्भात उपस्थितीत बैठक झाल्यानंतर पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यानंतर बुधवारी  दादरमध्ये जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आंदोलनकांनी कबुतरखान्यावर टाकलेली ताडपत्री काढून टाकली आणि आपला रोष व्यक्त केला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. या सगळ्या प्रकारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी काही मार्ग सुचले असल्याचे म्हटलं आहे.

"एकीकडे आस्था आहे, लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोक आरोग्य आहे. या दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल. त्यामुळे लोकभावना आणि धार्मिक भावना ही जपण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करत येईल आणि त्यातून कुठेही आरोग्याला धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. काही मार्ग काल आम्हाला सुचलेले देखील आहेत. ते आम्ही कोर्टासमोर मांडू जेणेकरुन इतक्या वर्षांची ही परंपरा खंडित होणार नाही. त्यासोबत आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार नाही," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 कबुतरांनाही खाण्याचा अधिकार - अजित पवार

"मुंबईतील परिसरात अनेक कबुतरखाने आहेत. ते अनेक वर्षांपासून आहे. कबुतरांच्या विष्ठेमुळे आजार उद्भवतात असं काहींचं म्हणणं आहे. जनतेच्या मनात काय आहे हेदेखील महत्त्वाचं आहे. यासंदर्भातही चर्चा झाली आहे. सरकार याबाबत सकारात्मक मार्ग निघावा अशाच विचाराचं आहे असं मुख्यमत्र्यांनी सांगितंल आहे. काल त्यांनी फार तीव्रतेने भूमिका मांडली होती. जसा आपल्याला आहे तसा कबुतरांनाही खाण्याचा अधिकार आहे. ताडपत्री टाकल्याने कबुतरं मरत आहेत, त्यांना तिथे खायला मिळत नाही. त्यांनी वर्षानुवर्षं तिथे खाण्याची सवय लागली आहे असं त्यांनी सांगितलं आहे. कोर्टाने मात्र मुंबई महापालिकेला कडक आदेश दिले आणि त्यानुसार कारवाई कऱण्यात आली. कायदा सुव्यस्थेचं काम पोलिसांचं आहे आणि ते केलं जात आहे," असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
 

Web Title: Chief Minister Devendra Fadnavis reacted to the clash that took place near Dadar Kabootar Khana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.