Mahadevi Elephant : 'महादेवी' हत्तीसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय; बैठकीत काय ठरलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 13:07 IST2025-08-05T13:06:48+5:302025-08-05T13:07:11+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील मठातील महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी आंदोलन सुरू आहे. याबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली.

Mahadevi Elephant : 'महादेवी' हत्तीसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय; बैठकीत काय ठरलं?
मागील काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या गावातील मठातील महादेवी या हत्तीला परत आणण्यासाठी आंदोलने सुरू आहेत. काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने महादेवी हत्तीला वनतारामध्ये हलवण्याचे आदेश दिले होते. मागील आठवड्यात या हत्तीला वनतारामध्ये हलवण्यात आले आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातून या हत्तीला परत देण्याची मागणी सुरू आहे. या मागणीसाठी रविवारी निदर्शने करण्यात आली. दरम्यान, आज याबाबत राज्य सरकारने बैठक आयोजित केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महादेवी हत्तीसाठी राज्य सरकार मध्यस्ती करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
राज्य सरकार पूर्ण ताकदीने मठासोबत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीस सांगितले. हत्तीणीची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचे पथक तयार करणार आहे. मठाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करावी, यासोबत राज्य सरकारही याचिका दाखल करणार आहे. महादेवी हत्ती परत आली पाहिजे ही सर्वांची इच्छा आहे. ३४ वर्षापासून महादेवी हत्ती नांदणी मठात आहे. ही हत्तीण परत आली पाहिजे, असंही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले.
काळजी घेण्यासाठी डॉक्टरांची टीम तयार करणार
"हत्तीणीची काळजी घेण्यासाठी एक टीम राज्य सरकार बनवेल. यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल. राज्य सरकार पूर्ण ताकदीने मठासोबत आहे, असंही बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
याबाबत खासदार धैर्यशील माने यांनी प्रतिक्रिया दिली. माने म्हणाले, महादेवी हत्तीसाठी महाराष्ट्र सरकार आपल्या पाठीशी आहे. सरकार मठासोबत आहे. जनभावनेचा आदर राखत सरकारने निर्णय घेतला आहे. लोकभावना पाहत सरकारने सकारात्मक निर्णय घेतला आहे, असंही माने म्हणाले.