शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध, १०० टक्के हरित वीज देणारे देशातील पहिले राज्य ठरणार : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 07:21 IST2025-08-16T07:21:32+5:302025-08-16T07:21:41+5:30
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीला हवामान बदलापासून संरक्षण दिले जाणार

शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध, १०० टक्के हरित वीज देणारे देशातील पहिले राज्य ठरणार : मुख्यमंत्री
मुंबई : जगातील सर्वात मोठा डिस्ट्रिब्युटेड सोलार प्रकल्प महाराष्ट्रात राबवला जात असून, यामुळे शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीजपुरवठा करून राज्य १०० टक्के हरित वीज देणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. विविध नदीजोड प्रकल्पांद्वारे तापी व गोदावरीच्या खोऱ्यात पाणी आणून सिंचन वाढवण्याचे काम सुरू असून, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीला हवामान बदलापासून संरक्षण दिले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.
शुक्रवारी दिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात ध्वजारोहणानंतर फडणवीस म्हणाले, ऑपरेशन सिंदूरमधून भारतीय सैन्याने दाखवलेली ताकद हा नव्या भारताचा परिचय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत एका दशकात ११ व्या वरून चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचला. आत्मनिर्भर भारत व स्वदेशीच्या संकल्पनेनुसार महाराष्ट्राला नवाचार, स्टार्टअप्स व तंत्रज्ञानाचे केंद्र बनवूया. राज्यातील महामार्ग, बंदरे व विमानतळ विकास प्रकल्प गतीने सुरू आहेत. वाढवण बंदर पूर्ण झाल्यावर ते जगातील टॉप १० बंदरांमध्ये गणले जाईल. पुणे, नवी मुंबई, नागपूर, अमरावती, गडचिरोली आणि छत्रपती संभाजीनगर विमानतळ प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. समृद्धी व शक्तिपीठ महामार्ग विकासाला बळ देत आहे. तर, १००० लोकसंख्येच्या प्रत्येक गावात काँक्रीट रस्ते केले जाणार आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
देशातील ४० टक्के परकीय गुंतवणूक राज्यात
देशातील एकूण थेट परदेशी गुंतवणुकीपैकी ४० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येत असल्याने मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत आहे. वस्तू-उत्पादन, निर्यात, स्टार्टअप्समध्ये राज्य आघाडीवर आहे. कौशल्य प्रशिक्षण आणि शिक्षण सुविधांच्या विकासातून राज्य देशाच्या विकासाचे नेतृत्व करण्यास सज्ज होत आहे. गडचिरोलीला माओवादमुक्त करण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांचे कौतुक करत लवकरच गडचिरोली देशातील सर्वात मोठे स्टील हब होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.