मुख्यमंत्री फडणवीसच, आज मुंबईत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भव्य शपथविधी सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 05:12 IST2024-12-05T05:12:07+5:302024-12-05T05:12:42+5:30
१९ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार

मुख्यमंत्री फडणवीसच, आज मुंबईत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भव्य शपथविधी सोहळा
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी सायंकाळी साडे पाच वाजता आझाद मैदानावर शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि महायुतीचे हजारो कार्यकर्ते व लाडक्या बहिणींच्या साक्षीने हा समारंभ होईल. पाच वर्षांनंतर फडणवीस मुख्यमंत्री म्हणून परत येत आहेत.
बुधवारी फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग प्रशस्त झाला. भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात सर्वानुमते निवड झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनाेद तावडे यांच्या उपस्थितीत यासाठी विधानभवनच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक झाली. फडणवीस यांची नेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला आणि विविध नेत्यांनी त्यास अनुमोदन दिले.
राज्यपालांना दिले सत्तास्थापनेबाबतचे पत्र
विधिमंडळ पक्षनेता निवडीनंतर फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या नेत्यांनी राजभवनवर जाऊन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि सत्तास्थापनेचा दावा करणारे पत्र त्यांना दिले. भाजपसह मित्रपक्ष शिंदेसेना, अजित पवार गट आणि महायुतीला पाठिंबा देणाऱ्या इतर लहान पक्षांनी आपली पत्रे राज्यपालांकडे सादर केली. निर्मला सीतारामन आणि विजय रुपानी हे निरीक्षकही यावेळी उपस्थित होते. शिंदे यांच्या हस्ते सत्ता स्थापनेबाबतचे पत्र राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आले.
देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे फक्त 'लोकमत'नेच प्रसिद्ध केले होते. राजकीय बातम्यांमध्ये 'लोकमत' कायमच अग्रेसर राहिला आहे. ‘लोकमत’ने नेहमीच विश्वासार्ह पत्रकारिता केली आहे. तेच पुन्हा अधोरेखित झाले आहे.
तिसऱ्यांदा होणार मुख्यमंत्री
सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर गुरुवारी फडणवीस मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतील. अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
किती जण शपथ घेणार?
सूत्रांनी सांगितले की आपल्या पक्षाच्या सर्व १२ जणांना मंत्रिपदाची उद्याच शपथ द्यावी असा आग्रह शिंदे यांनी धरला आहे. मात्र भाजपकडून तो रात्री उशिरापर्यंत मान्य करण्यात आला नव्हता. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत शपथविधी समारंभ होणार आहे. ते २० ते २५ मिनिटेच समारंभाला उपस्थित असतील. त्यामुळे एवढ्या मंत्र्यांचा शपथविधी घेणे शक्य नाही, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचा तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा शपथविधी होईल असे रात्री उशिरापर्यंतचे चित्र होते.
शिंदेंच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह
शिंदेंनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे अशी आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांची इच्छा आहे, तशी विनंती आम्ही त्यांना केली आहे, असे शिंदेसेनेचे नेते उदय सामंत यांनी सांगितले. बुधवारी रात्री उशिरापर्यंत यासंदर्भातील निर्णय झाला नव्हता.
उद्धव ठाकरे, शरद पवारांना निमंत्रण
पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांनाही शपथविधी साेहळ्याचे निमंत्रण.