Join us

मनसे आता झाली 'उनसे', उमेदवार नसलेली सेना, मुख्यमंत्र्यांचा राजना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 18:30 IST

मनसे पहिल्यांदा  महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यानंतर मतदार नसलेली सेना झाली आणि आत्ता उमेदवार नसलेली सेना म्हणजे उनसे झाली आहे असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला लगावला आहे

मुंबई - मनसे पहिल्यांदा  महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यानंतर मतदार नसलेली सेना झाली आणि आत्ता उमेदवार नसलेली सेना म्हणजे उनसे झाली आहे असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला लगावला आहे. तसेच राज ठाकरे हे पूर्णपणे तणावग्रस्त झालेले आहेत असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना काढला. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं. 

राज ठाकरे यांना कोणीही सोबत घेण्यासाठी तयार नाहीत, आघाडीमध्ये जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता मात्र तेथेही काँग्रेसने त्यांना नाकारले आहे. त्यामुळे राज ठाकरे तणावग्रस्त झाले आहेत असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात मतदान करा असं आवाहन राज यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलं होतं. तसेच हे सरकार हिटलरशाहीचं सरकार आहे. जर देशाची लोकशाही वाचवायची असेल तर मोदींना सत्तेतून खाली आणावं असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं होतं. आपल्या भाषणाचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला तर झाला पण भाजपाविरोधात मोहीम अशीच सुरु ठेवणार असून त्यासाठी पुढील काळात 10 रिमाइंडर सभा देखील राज्यभरात घेणार असल्याचं राज यांनी सांगितले होते. 

राज ठाकरेंच्या भाजपाला केलेल्या टार्गेटमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला धारेवर धरलं आहे. मागच्या वेळी देखील राज ठाकरे यांची स्क्रीप्ट बारामतीहून येते, राज हे बारामतीचे पोपट आहेत असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला होता तर यावर राज यांनीही मुख्यमंत्र्यांवर हवा गेलेला फुगा अशारितीने टीका केली होती. त्यामुळे आगामी काळात राज ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा राजकीय सामना पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मनसेवर केलेल्या या टीकेचं उत्तर राज ठाकरे काय देतात हे पाहणे गरजेचे आहे.   

टॅग्स :लोकसभा निवडणूकदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेमनसेमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019