छोटा शकीलच्या टोळीने ड्रग्ज तस्कराला महिनाभर ठेवले डांबून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 08:06 IST2025-07-17T08:06:03+5:302025-07-17T08:06:32+5:30

ड्रग्जच्या व्यवहारातून वाद : गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशमधून सुटका करत सात जणांना अटक

Chhota Shakeel's gang held a drug smuggler captive for a month | छोटा शकीलच्या टोळीने ड्रग्ज तस्कराला महिनाभर ठेवले डांबून

छोटा शकीलच्या टोळीने ड्रग्ज तस्कराला महिनाभर ठेवले डांबून

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर साजिद इलेक्ट्रिकवाला आणि त्याच्या साथीदाराचे ड्रग्जच्या व्यवहारातून साजीदचे अपहरण करत महिनाभर डांबून ठेवल्याचे गुन्हे शाखेच्या कारवाईतून समोर आले आहे. साजीदची उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून सुटका करत, या टोळीच्या सदस्यांना गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश, रायगड आणि मुंबईतून जेरबंद केले आहे. 

कुख्यात छोटा शकीलच्या टोळीने हे अपहरण केल्याची माहिती मिळाली असून, गुन्हे शाखा याप्रकरणी तपास करत आहे. सरवर खान, मेहताब अली, संतोष वाघमारे, राहुल सावंत, सतीश कडु, युनिस तेवरपिल्ली आणि तौफिक सैंडी यांना अटक केली आहे. खान हा छोटा शकीलचा भाऊ अन्वरचा साथीदार आहे. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, १२ जूनला अंधेरीतील एका हॉटेलमधून साजीद आणि त्याच्या साथीदाराचे अपहरण झाले. अपहरणकर्त्यांनी दोघांना महिनाभर रायगड, नाशिक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि दिल्लीत डांबून ठेवले. त्यांना बेदम मारहाण करत लाखो रुपयांची खंडणी उकळली. 

साजीदच्या सहकाऱ्याने नवी मुंबई येथून त्यांच्या तावडीतून सुटका करून पळ काढला. त्याने थेट मुंबई गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. 

मुंबई, रायगड जिल्ह्यातून  चौकडीला घेतले ताब्यात
गुन्हे शाखेने तातडीने ओशिवरा पोलिस ठाण्यात विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हा नोंदविला. गुन्ह्याची उकल आणि आरोपींना अटक करून अपहरण केलेल्या ड्रग्ज माफियाची सुखरूप सुटका करण्याचे आव्हान गुन्हे शाखेसमोर होते. अपहरणकर्ते कधीही ड्रग्ज माफियाची हत्या करू शकत असल्याची शक्यता नाकारता येत नव्हती.  गुन्हे शाखेचे उपायुक्त राजतिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके स्थापण्यात आली. पथकाने टोळीतील सदस्यांचे लोकेशन शोधले. उत्तर प्रदेश येथून साजीदची फिल्मी स्टाइलने सुटका करत तीन आरोपींना उत्तर प्रदेश, तर चौकडीला मुंबई आणि रायगड जिल्ह्यातून अटक करण्यात आली.

छोटा शकीलच्या भावाचे अपहरणामागे कनेक्शन...
साजीद यास कोट्यवधींच्या १५१ किलो एमडी तस्करीप्रकरणी २०१५ मध्ये राज्य दहशतवादविरोधी पथकाने अटक केली होती. त्यानंतर तो अनेक वर्षे कारागृहात होता. खानने त्याला एमडी ड्रग्ज फॅक्टरी सुरू करण्यासाठी ५० लाख रुपये दिले होते. मात्र, साजीदने फॅक्टरी उघडली नाही. त्याच पैशांवरून दोघांमधील वाद टोकाला गेला. यातूनच हत्येच्या उद्देशाने त्याचे अपहरण केले. महिनाभरात खानने त्याच्याकडून ४० लाखांहून अधिक पैसे उकळले. छोटा शकीलचा भाऊ अन्वरच्या सांगण्यावरून हे अपहरण घडवून आणल्याचा संशय असून, त्या दिशेने गुन्हे शाखा तपास करत आहे.

Web Title: Chhota Shakeel's gang held a drug smuggler captive for a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.